देश पातळीवर एकाच अनुसूचित बंजारा जमातीला आणण्याची गरज

बंजारा समाजाच्या बैठकीत उमटले सूर

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
मानोरा,
voices raised at banjara community meeting बंजारा या आदीम जमातीला महाराष्ट्रामध्ये भटके विमुक्त प्रवर्गामध्ये ठेवण्यात आल्याने इतर राज्यांनी दिलेल्या सामाजिक आरक्षणाच्या तुलनेत आमच्यावर अन्याय होत असल्याची भावना आमदार बाबूसिंग महाराज राठोड यांच्यासमवेत माजी आमदार निलय नाईक, हरिभाऊ राठोड यांच्यासह समाजात कार्यरत असलेल्या विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी व्यक्त केली.
 
 
manora
 
राज्याला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मोठी भूमिका निभावलेले हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या गहुली या जन्मगावी आयोजित बैठकीत राज्यातील बंजारा समाजाचे सामाजिक प्रश्न शासन दरबारी मांडणार्‍या सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते व काही आजी-माजी लोकप्रतिनिधी एकवटले होते. सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या राज्यातील बंजारा या समाजाला आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या महाराष्ट्राच्या सीमांना लागून असलेल्या राज्यांच्या बंजारा समाजाच्या धर्तीवर केंद्र सरकारच्या अनुसूचित जमाती च्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची या समाजाची जुनी मागणी आहे. त्या अनुषंगाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन सरकारने निर्णय घेतला, त्याच धर्तीवर निजाम कालीन गॅझेटमध्ये बंजारा समाज हा आदिवासी म्हणून नोंद आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला देखील अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे, अशी एकमुखी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी बंजारा समाजाच्या वतीने कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या बैठकीस समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.