भीषण अपघातात यूट्यूबर छवि व आईचा मृत्यू

    दिनांक :26-Aug-2026
Total Views |
उज्जैन-गरोठ
youtuber chhavi varshney महाकालाच्या दर्शनासाठी घरातून निघालेल्या हाथरस येथील कुटुंबावर मध्य प्रदेशातील आगर जिल्ह्यात काळाने घाला घातला. उज्जैन-गरोठ फोरलेन मार्गावर मंगळवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात २३ वर्षीय यूट्यूबर छवि वार्ष्णेय आणि तिची आई सारिका यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत प्रवास करणारे वडील श्यामलाल, समधी सूरजपाल आणि कारचालक सचिन हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
 
 
youtuber chhavi varshney
रामाखेड़ी गावाजवळ हा अपघात झाला. छवि, तिचे वडील श्यामलाल, आई सारिका, समधी सूरजपाल आणि चालक सचिन हे कारने उज्जैनकडे जात होते. त्यांची कार पुढे जाणाऱ्या ट्रकवर जोरदार आदळली. धडक इतकी भीषण होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत छवि आणि तिची आई सारिका यांनी घटनास्थळीच प्राण गमावले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची (NHAI) टीम घटनास्थळी दाखल झाली. जखमी श्यामलाल, सूरजपाल आणि चालक सचिन यांना प्रथम बडौद येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना आगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविले असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
हाथरस जंक्शन परिसरातील महौखास गावची रहिवासी असलेली छवि वार्ष्णेय हिने अल्पावधीतच सोशल मीडियावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. तिचा चुलत भाऊ सचिन वार्ष्णेय यांच्या माहितीनुसार, छवि अभ्यासातही हुशार होती. तिने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले होते. सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळे करण्याची आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची तिची इच्छा होती.
छविने २०२१ मध्ये यूट्यूब चॅनेल सुरू youtuber chhavi varshney  केले. सुरुवातीला ती दैनंदिन जीवनाशी संबंधित व्ह्लॉग आणि व्हिडिओ शेअर करत असे. तिच्या कंटेंटला हळूहळू प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळू लागला आणि तिचे चॅनेल वेगाने लोकप्रिय झाले. त्यानंतर तिने ऑनलाइन गेमिंगशी संबंधित व्हिडिओही तयार करण्यास सुरुवात केली.छविच्या लोकप्रियतेचा अंदाज तिच्या यूट्यूब चॅनेलवरील सात लाखांहून अधिक सबस्क्रायबर्सवरून येतो. इंस्टाग्रामवरही तिला एक लाखांहून अधिक लोक फॉलो करत होते. सोशल मीडियावरील वाढत्या लोकप्रियतेमुळे ती आपल्या परिसरातील चर्चित डिजिटल क्रिएटर बनली होती. तिच्या या प्रवासात कुटुंबीयांचीही तिला कायम साथ होती.छविचे वडील श्यामलाल हे गावात किराणा दुकान चालवतात. मुलीने पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कुटुंबाने तिला नेहमीच प्रोत्साहन दिले. छविच्या कुटुंबात तिची आई, वडील आणि २६ वर्षीय मोठा भाऊ कान्हा आहेत. महाकालाच्या दर्शनासाठी निघालेल्या या कुटुंबाच्या प्रवासाचा झालेला हा दुर्दैवी अंत परिसरात हळहळ व्यक्त करणारा ठरला आहे.