नेपाळच्या महापुरात २८८ भारतीय बेपत्ता...सरकार अलर्ट

परराष्ट्र मंत्रालयाकडून विशेष नियंत्रण कक्ष

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
288 Indians missing in Nepal floods नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली असून, या नैसर्गिक आपत्तीत २८८ भारतीय नागरिक बेपत्ता असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयात विशेष नियंत्रण कक्षही सुरू करण्यात आला आहे. नेपाळमध्ये आतापर्यंत पुरामुळे १७८ जणांचा मृत्यू झाला असून ७०० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे.नेपाळमधील बचाव पथकांना चितवन जिल्ह्यात सर्वाधिक ६४ मृतदेह सापडले आहेत. याशिवाय धादिंगमध्ये २७, नवलपरासी पूर्वमध्ये २६, गोरखा जिल्ह्यात २० आणि नुवाकोटमध्ये १२ मृतदेह आढळले आहेत. पुराचा वेग आणि मोठ्या प्रमाणातील मलब्यामुळे अनेक भागांमध्ये बचावकार्याला अडथळे निर्माण झाले आहेत.
 
 
288 Indians missing in Nepal floods
 
 
भारतीय नागरिकांच्या बेपत्ता होण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी माहिती दिली. २८८ भारतीय नागरिकांचा शोध घेतला जात असून, त्यापैकी ७३ जण त्रिशूली येथे काम करणारे होते. तमिळनाडूमधील ३७ आणि ४९ जणांचे दोन स्वतंत्र गट कैलाश मानसरोवर यात्रेसाठी नेपाळमध्ये गेले होते. हे दोन्ही गटही बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय पश्चिम बंगालमधील ३२ नागरिक आणि विविध राज्यांतील ६१ नागरिक बेपत्ता आहेत.दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी नेपाळच्या पंतप्रधानांशी संवाद साधून भारत नेपाळच्या या संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले आहे. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
 
 
 
या महापुराचा फटका नेपाळच्या पायाभूत सुविधांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे १९ पूल, सुमारे ४० किलोमीटरचा महामार्ग आणि ९ जलविद्युत प्रकल्प उद्ध्वस्त झाले आहेत. फ्लॅश फ्लडच्या पाण्याची पातळी जवळपास ३० फुटांपर्यंत पोहोचल्याने अनेक घरे आणि वाहने पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेली.या विनाशकारी पुरामागे तिबेटमध्ये हिमनदी फुटल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातून आलेला पाणी आणि मलब्याचा मोठा प्रवाह नेपाळमधील भोटेकोशी आणि त्रिशूली नद्यांमध्ये पोहोचल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुराच्या वेगामुळे रसुवा परिसरातील नागरिकांचे मृतदेह तब्बल १५० किलोमीटर अंतरावर असलेल्या चितवनमध्ये सापडत आहेत. खराब हवामान, वाहतुकीचे मार्ग खंडित होणे आणि मोठ्या प्रमाणातील मलबा यामुळे बचावकार्य कठीण झाले आहे. तरीही मदत आणि बचाव पथके मलब्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत आहेत. नेपाळमध्ये बेपत्ता असलेल्या नागरिकांमध्ये अनेक परदेशी नागरिकांचाही समावेश असल्याचे समोर आले आहे.