आ. रवि राणा यांच्याकडून डफरीनची झाडाझडती

वैद्यकीय अधिकाऱ्यांशी साधला संवाद

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
अमरावती,
amravati hospital fire जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे घडलेल्या अत्यंत दुर्दैवी दुर्घटनेनंतर आमदार रवि राणा यांनी बुधवारी अपघातस्थळी भेट देऊन संपूर्ण विभागाची पाहणी केली. या दुर्घटनेची परिस्थिती, रुग्णालयातील आपत्कालीन व्यवस्था, अग्निसुरक्षा यंत्रणा तसेच नवजात शिशूंच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या सुविधांची त्यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस, कक्षसेविका तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून घटनेबाबतची माहिती जाणून घेतली.
 
 
uik
एका आईने आपल्या जिवाचा तुकडा गमावणे ही वेदना शब्दांत व्यक्त करता येणार नाही, अशी भावना आ. राणा यांनी व्यक्त केली. या घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी मुख्य सचिवांना आवश्यक निर्देश दिले आहेत. रुग्णालयांमध्ये ज्या-ज्या ठिकाणी आपत्कालीन सुविधांची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी आवश्यक ती व्यवस्था तातडीने उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येणार आहे. पालकमंत्रीदेखील या घटनेचा सातत्याने फॉलोअप घेत आहेत, असे आ. रवि राणा यांनी सांगितले. या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी शासनाने चौकशी समिती नियुक्त केली असून, समितीच्या अहवालातून घटनेमागील कारणे आणि जबाबदारी निश्चित झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. विशेषतः अग्निशमन यंत्रणेमध्ये असलेल्या त्रुटींमुळे एवढी मोठी दुर्घटना घडली असल्यास, केवळ एका रुग्णालयापुरती मर्यादित न राहता संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील तसेच शासकीय, निमशासकीय आणि इतर रुग्णालयांमधील फायर सेफ्टी यंत्रणेचे ऑडिट होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. सुरक्षा सुविधांची नियमित तपासणी झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
(छायाचित्र : राणा : जळीत कक्षात अधिकाऱ्यांकडून माहिती घेताना आ. रवि राणा)