अमरावती,
amravati women hospital fire येथील स्त्री रुग्णालयातल्या नवजात बालकांच्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीची चौकशी करण्यासाठी शासनाने गठीत केलेल्या आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्या समितीने बुधवारी दिवसभर बंद दाराआड खलबते केले. घटनेशी संबंधित सर्वांशी त्यांनी चर्चा केली. पुढील दोन दिवसांत समिती आपला अहवाल देईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चौकशी समितीचे प्रमुख संजय काटकर दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात होते. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह अन्य प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा एक समिती नेमली होती. त्यांच्या निष्कर्षावर चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. तसेच आरोग्य सहसंचालक डाॅ. सुनीता गोलाईत यांनी सुद्धा स्वतंत्रपणे चौकशी केली होती. त्यांच्यासोबतही समिती प्रमुखांची चर्चा झाली. समितीचे सदस्य सचिव आरोग्य उपसंचालक डाॅ. जयंत मुळे व आराेग्य संचालक डाॅ. नितीन अंबाडेकर यांच्यासह अन्य सदस जिल्हा स्त्री रुग्णालयात दिवसभर होते. त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या कक्षात त्यांनी सर्वांशी संवाद साधला. घटनेच्या वेळी रुग्णालयात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून त्यांनी आवश्यक ती माहिती जाणून घेतली. महत्त्वाचा मुद्दा ठरलेल्या फायर ऑडीट, इलेक्ट्रीकल ऑडीट व अन्य सुविधांच्या देखभाल दुरुस्ती संदर्भात सविस्तर माहिती समितीच्या सदस्यांनी नोंदवून घेतली. संबंधित सर्वांनी आपापली बाजू मांडली. स्व:ता समितीच्या सदस्यांनी घटनास्थळ, फायर यंत्रणा, इलेक्ट्रिक व्यवस्थेची पाहणी केली.समितीने अधिकृतपणे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला नाही. अहवालातूनच सर्व माहिती मिळेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. कोणावर कारवाई होते हे आता अहवालानंतरच स्पष्ट होईल.