इन्स्टावर गाणे टाकताच 2 तासांनंतर हत्या

2 दिवसांपासून सुरू होती प्लॅनिंग

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
ankit baliyan murder उत्तर प्रदेशातील शामली येथे हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान याच्या हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. प्राथमिक तपासानुसार अंकितची हत्या पूर्वनियोजित असल्याचे समोर आले आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील हल्लेखोर घटनेच्या सुमारे दोन दिवस आधीपासून अंकितवर पाळत ठेवून होते. बुधवारी त्यांनी अंकितच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले. घरापासून जिमपर्यंत त्याचा पाठलाग केल्यानंतर संधी साधत जिमबाहेर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात अंकितचा मृत्यू झाला.
 

ankit baliyan murder haryanvi singer tracked for two days before shamli gym shooting 
हल्लेखोरांना अंकितच्या दैनंदिन वेळापत्रकाची पूर्ण माहिती असल्याचे तपासातून स्पष्ट होत आहे. तो घरातून कोणत्या वेळी बाहेर पडतो आणि जिममधून कधी परततो, याची माहिती हल्लेखोरांकडे होती. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी आता जिम तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रफिती तपासण्यास सुरुवात केली आहे. संशयास्पद वाहने आणि तरुणांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, अंकितचे ठिकाण आणि त्याच्या वेळापत्रकाची माहिती हल्लेखोरांपर्यंत नेमकी कोणी पोहोचवली, याचाही शोध घेतला जात आहे.
अंकितचे काका चिकू यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, अंकितसोबत काम करणाऱ्या राणा नावाच्या व्यक्तीने त्याला धमकी दिल्याचे कुटुंबीयांना माहीत होते. त्यामुळे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा या हत्येत सहभाग असण्याची शक्यता असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या दिशेनेही पोलिस तपास करत आहेत.
दरम्यान, पोलिसांच्या तपासात हल्लेखोरांचे वय अंदाजे २१ ते २६ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेश आणि हरियाणातील संशयित तरुणांची माहिती गोळा केली जात असून, हल्लेखोर नेमके कुठे थांबले होते, कोणाच्या संपर्कात होते आणि अंकितचे ठिकाण त्यांना कोणी उपलब्ध करून दिले, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची अनेक पथके कार्यरत आहेत.अंकितच्या हत्येनंतर त्याची समाजमाध्यमांवरील एक पोस्टही चर्चेत आली आहे. हत्येच्या सुमारे दोन तास आधी त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्याच्या गाण्याचा एक चित्रफितीचा भाग प्रसारित करण्यात आला होता. या गाण्यात ‘खास भाई की भड़क के ऊपर मर्डर मार दे सड़क के ऊपर…’ असे बोल आहेत. ही चित्रफीत जास्तीत जास्त लोकांनी प्रसारित करावी, असे आवाहनही अंकितने केले होते.अंकित हा शामली जिल्ह्यातील बंटीखेडा गावचा रहिवासी होता. गेल्या काही वर्षांपासून तो हरियाणातील रोहतक आणि सोनीपत येथे गायन आणि अभिनयाचे शिक्षण घेत होता. ‘भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान’ या गाण्यामुळे त्याला विशेष ओळख मिळाली होती. २०२३ मध्ये शामली येथे झालेल्या एका रस्त्यावरील कार्यक्रमादरम्यानही तो चर्चेत आला होता. आता त्याच्या हत्येचा तपास कोणत्या दिशेने पुढे जातो आणि या पूर्वनियोजित हत्येमागील नेमके सूत्रधार कोण, याचा उलगडा होण्याकडे लक्ष लागले आहे.