दुबई,
Asif Khan suspended for 15 months यूएईचा अनुभवी क्रिकेटपटू आसिफ खान याच्यावर प्रतिबंधित पदार्थाच्या सेवनप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने १५ महिन्यांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या डोपिंगविरोधी संहितेचे उल्लंघन केल्याचे आसिफने मान्य केले आहे. त्यानंतर जागतिक डोपिंगविरोधी संस्था (WADA) आणि आयसीसीसोबत झालेल्या केस रिझोल्यूशन करारानुसार त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.३६ वर्षीय आसिफ खानच्या नमुन्यात मेस्टेरोलोनच्या मेटाबोलाइटचा अंश आढळला होता. ८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेबाहेरील डोपिंग चाचणीत प्रतिबंधित पदार्थाची उपस्थिती स्पष्ट झाली. यानंतर आसिफने आयसीसी डोपिंगविरोधी संहितेतील कलम २.१ चे उल्लंघन केल्याची कबुली दिली.

आसिफवरील १५ महिन्यांची बंदी ८ सप्टेंबर २०२५ पासून लागू करण्यात आली असून ती ७ डिसेंबर २०२६ पर्यंत कायम राहणार आहे. मात्र, ८ ऑक्टोबर २०२६ पासून त्याला संघासोबत सराव करण्याची तसेच क्लब किंवा आयसीसीच्या सदस्य संघटनांच्या सुविधा वापरण्याची परवानगी असेल. त्याचे स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमन मात्र ८ डिसेंबर २०२६ पासूनच होऊ शकणार आहे.या कारवाईचा परिणाम आसिफच्या मागील कामगिरीवरही झाला आहे. आयसीसीच्या नियमानुसार ८ सप्टेंबर २०२५ ते २९ डिसेंबर २०२५ या कालावधीतील त्याचे वैयक्तिक निकाल रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे या काळात मिळवलेली पदके, गुण, बक्षीस रक्कम किंवा इतर पुरस्कार त्याला गमवावे लागणार आहेत. केस रिझोल्यूशन कराराचा भाग असल्याने या निर्णयाविरोधात अपील करण्याची तरतूदही नाही.
आसिफ खानने २०२२ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने यूएईकडून ३८ एकदिवसीय आणि ५६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. संघातील अनुभवी खेळाडू म्हणून त्याची भूमिका महत्त्वाची असल्याने त्याच्या निलंबनाचा यूएईच्या आगामी योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आता ७ डिसेंबर २०२६ पर्यंतची बंदी पूर्ण केल्यानंतर आसिफला ८ डिसेंबरपासून पुन्हा स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, अलीकडेच आयसीसीने आणखी एका क्रिकेटपटूवर तब्बल आठ वर्षांची बंदी घातली होती. त्यामुळे क्रिकेटमधील डोपिंगविरोधी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय पातळीवर कठोर कारवाई सुरू असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे.