नागपूर,
we the people of india भारतीय संविधान हे सशक्त, समताधिष्ठित आणि लोकशाही समाजाच्या निर्मितीचा भक्कम आधार आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेचा सखोल अभ्यास केल्यास देशातील प्रत्येक नागरिकाला संविधानाने माणूस म्हणून दिलेले अधिकार, समानता आणि प्रतिष्ठेचे महत्त्व स्पष्ट होते, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते, संविधान अभ्यासक तथा समता फेलो अॅड. सचिन मेकाले यांनी केले.
जनहित युवा फाऊंडेशन आणि तथागत फाऊंडेशन, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान जागर अभियानांतर्गत ‘आम्ही भारताचे लोक’ या विषयावर तथागत अभ्यासिका, काशीनगर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मुख्य मार्गदर्शक म्हणून अॅड. मेकाले बोलत होते. कार्यशाळेचे उद्घाटन राज्य कर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत मुंद्रे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजसेवक प्रा. सुधाकर स्थूल होते. जनहित युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवशंकर ताकतोडे आणि समाजसेविका रंजना सुरजुसे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
अॅड. मेकाले म्हणाले की, हजारो वर्षांपासून सामाजिक विषमतेचा सामना करणाऱ्या भारतीय समाजाला समतेच्या आधारावर स्थिर करण्यामध्ये संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. देशाची एकता, अखंडता आणि सामाजिक समता टिकवून ठेवण्यासाठी संविधानाचे महत्त्व समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. हे कार्य करण्याची जबाबदारी सुशिक्षित नागरिकांची आहे. यावेळी प्रशांत मुंद्रे आणि रंजना सुरजुसे यांनीही भारतीय संविधान तसेच भारतीय समाजाच्या वाटचालीवर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात सुधाकर स्थूल यांनी संविधानातील मूल्ये आणि लोकशाही व्यवस्था अधिक मजबूत ठेवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेऊन सातत्याने कार्य करण्याची गरज व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवशंकर ताकतोडे यांनी केले. सूत्रसंचालन दिशा गायकवाड यांनी केले, तर नानाजी ढेंगरे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरती कोतुरवार-मेकाले, अक्षय राऊत, लक्ष्मीकांत गजभिये, प्रियंका सोमकुंवर, विजय पोहरकर, पल्लवी मनवर, दीपाली कांबळे, रेखा मून, दिलीप ताकसांडे, विवेक लांजेवार, अमन खोब्रागडे, अविराज वासनिक आणि विजय पाटील यांनी परिश्रम घेतले.
सौजन्य: शिवशंकर ताकतोडे, संपर्क मित्र