पुरात नेपाळला भारताचा मदतीचा हात!

मोदींशी बालेन शाह यांची चर्चा

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
काठमांडू,
Balen Shah's discussion with Modi नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली असून आतापर्यंत १६० जणांचा मृत्यू झाला आहे, तर ७०० हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. या संकटाच्या काळात भारताने नेपाळच्या मदतीसाठी पुढाकार घेत मदत साहित्य पाठवले आहे. भारताकडून मिळालेल्या मदतीनंतर नेपाळचे पंतप्रधान बलेंद्र शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख केला.बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बलेंद्र शाह यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या चर्चेदरम्यान त्यांनी नेपाळमधील पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. तसेच या कठीण परिस्थितीत भारत नेपाळला आवश्यक ती सर्व मानवतावादी मदत देण्यासाठी तयार असल्याचे आश्वासन दिले. भारतीय पथके बचाव आणि मदतकार्यात आवश्यक सहकार्य करत असल्याचेही मोदी यांनी सांगितले.
 
 
 
slow
 
पंतप्रधान मोदींच्या मदतीच्या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना बलेंद्र शाह यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे भारताचे आभार मानले. या संकटाच्या काळात नेपाळबद्दल व्यक्त केलेली सहानुभूती आणि मदतीची तयारी याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. भारताचे हे सहकार्य दोन्ही देशांमधील मैत्रीचे मजबूत बंध दर्शवणारे असल्याचेही शाह यांनी म्हटले.दरम्यान, भारताकडून पाठवण्यात आलेला मदतसाठा काठमांडू विमानतळावर पोहोचला आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या भागांमध्ये बचाव आणि मदतकार्य सुरू असून, भारताकडूनही या कार्याला सहकार्य केले जात आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नेपाळमधील परिस्थितीवर दुःख व्यक्त केले आहे. नेपाळमधील पुरामुळे झालेला विध्वंस अत्यंत वेदनादायी असल्याचे सांगत त्यांनी या आपत्तीत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. संकटाच्या या काळात भारत सरकार नेपाळच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.