भाऊ कदम रंगभूमीवर घेऊन येणार हास्याची मेजवानी

‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ नाटकाचा शुभारंभ २९ ऑगस्टला

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
मुंबई
pahili lagnachi dusari premachi आपल्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना नेहमीच खळखळून हसवणारे लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम आता रंगभूमीवरही हास्याची मेजवानी घेऊन येत आहेत. नात्यांमधील गंमत, प्रेम आणि लग्नाभोवती फिरणाऱ्या भन्नाट प्रसंगांची मनोरंजक गुंफण असलेले ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नवे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या नाटकात भाऊ कदम महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार असून, त्यांच्या विनोदी अभिनयाची खास शैली आणि नात्यांमधील गमतीदार प्रसंगांची सांगड रंगमंचावर पाहायला मिळणार आहे. नवनीत प्रॉडक्शन्स निर्मित या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ ऑगस्ट रोजी होणार आहे.
 

bhau kadam’s new marathi play pahili lagnachi dusari premachi set for august 29 premiere 
स्वप्नील बारसकर लिखित आणि संतोष पवार दिग्दर्शित या नाटकाची निर्मिती डॉ. उमेश आजगांवकर आणि सचिन सुभाष अवस्थी यांनी केली आहे. मैथिली वारंग, सुजाता किरण, पुनम सरोदे परब, साकार देसाई आणि भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका नाटकात आहेत. साई पियुष यांनी नाटकाला संगीत दिले आहे. नातेसंबंध, प्रेम आणि लग्न या विषयांची विनोदी अंगाने मांडणी करत हे नाटक प्रेक्षकांना मनमुराद हसवणारा मनोरंजनाचा अनुभव देणार आहे.
नाटकाबद्दल बोलताना भाऊ कदम म्हणाले, “‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नाटकाची कथा आणि संकल्पना खूपच गमतीदार आहेत. त्यातील प्रसंगही प्रेक्षकांना हसवणारे आहेत. माझ्यासोबतची संपूर्ण कलाकारांची टीम उत्तम आहे. रंगभूमीवर प्रत्यक्ष प्रेक्षकांसमोर काम करण्याचा अनुभव नेहमीच खास असतो आणि या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगासाठी मी खूप उत्सुक आहे.”
दिग्दर्शक संतोष पवार म्हणाले, “‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ हे नाटक साकारताना विनोदासोबतच नात्यांमधील भावनाही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. नाटकाची कथा, कलाकारांची केमिस्ट्री आणि प्रसंगांची मांडणी यामुळे रंगमंचावर एकामागोमाग एक धमाल प्रसंग पाहायला मिळतील. प्रेक्षकांनी नाटकाचा मनापासून आनंद घ्यावा, हीच आमची इच्छा आहे. पुण्यातील शुभारंभाच्या प्रयोगासाठी आम्ही सगळेच उत्सुक आहोत.”
निर्माते डॉ. उमेश आजगांवकर म्हणाले, “प्रेक्षकांना रंगमंचावर एक दर्जेदार आणि मनोरंजक नाटक अनुभवता यावे, या उद्देशाने ‘पहिली लग्नाची.. दुसरी प्रेमाची’ या नाटकाची निर्मिती केली आहे. उत्तम कलाकारांची टीम, स्वप्नील बारसकर यांचे लेखन आणि संतोष पवार यांचे दिग्दर्शन यामुळे हे नाटक आकाराला आले आहे. हे नाटक प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन करेल, याची आम्हाला खात्री आहे.”