कानपूर,
Both pilots died in Kanpur उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गुरुवारी प्रशिक्षणासाठी उड्डाण केलेले विमान मोठ्या स्फोटानंतर दुर्घटनाग्रस्त झाले. गंगा नदीच्या काठावरील नाथा पूर्वा गावाजवळ झालेल्या या अपघातात विमानातील दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये गुजरातचे प्रशिक्षक सचिन भाटिया आणि कर्नाटकचे प्रशिक्षणार्थी वैमानिक अभिषेक पुजारी यांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार, दोन इंजिन असलेल्या या प्रशिक्षण विमानाने सकाळी सुमारे ११.३० वाजता प्रशिक्षण केंद्रातून उड्डाण केले होते. जवळपास २० मिनिटांनी विमान परतीच्या प्रवासात असताना त्यात अचानक मोठा स्फोट झाला. त्यानंतर विमानाचा ताबा सुटला आणि ते नाथा पूर्वा गावाजवळ जमिनीवर कोसळले. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात धूर पसरला आणि विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले.

विमान कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघातस्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पोलिसांनी परिसर सील केला आणि लोकांना विमानाच्या अवशेषांपासून दूर ठेवले.अपघातात एका वैमानिकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या वैमानिकाला गंभीर अवस्थेत विमानाच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला.
दरम्यान, या विमान दुर्घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. उड्डाणादरम्यान झालेला स्फोट, संभाव्य तांत्रिक बिघाड किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ही दुर्घटना घडली, याचा तपास पोलीस आणि प्रशासनाकडून सुरू आहे. अपघाताच्या ठिकाणी मिळालेल्या अवशेषांची पाहणी केली जात असून अधिकृत तपासानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण समोर येणार आहे. दरम्यान, अलास्का येथील एका लष्करी विमानतळावर झालेल्या वेगळ्या विमान दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला होता. खराब हवामानामुळे परिसरात दाट धुके निर्माण झाले होते आणि विमान उतरवताना वैमानिकाला धावपट्टी दिसू शकली नव्हती.