बिहारमध्ये पूर अलर्ट! पाणी वाढताच रेल्वेगाड्या थांबणार

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
पाटणा,
Flood alert in Bihar नेपाळमध्ये निर्माण झालेल्या गंभीर पूरस्थितीचा परिणाम बिहारमधील सीमावर्ती भागांवर होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. जलसंपदा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. धरणांच्या स्थितीवरही विशेष नजर ठेवण्यात आली असून रेल्वे प्रशासनानेही सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना सुरू केल्या आहेत.नेपाळमधून येणाऱ्या पाण्यामुळे बिहारमधील सीमावर्ती भागात नदीच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पूर्व मध्य रेल्वेच्या समस्तीपूर विभागाने उच्च सतर्कता लागू केली आहे. विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) ज्योती प्रकाश मिश्रा यांनी पूर्व चंपारण आणि पश्चिम चंपारण जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून पूरस्थितीत परस्पर समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
 
 
slow
 
पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वेच्या सर्व कर्मचाऱ्यांना तसेच अभियांत्रिकी विभागातील अधिकाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. विशेषतः ट्रॅकमन आणि पूल कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील रेल्वे रुळ, पूल आणि पाण्याच्या पातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.रेल्वे प्रशासनाचे अधिकारी राज्याच्या पूर नियंत्रण संचालकांच्या नियमित संपर्कात राहणार आहेत. पूरस्थितीतील बदल, नदीच्या पाण्याची वाढती पातळी किंवा रेल्वे मार्गाच्या सुरक्षेशी संबंधित कोणतीही माहिती तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
 
 
रेल्वे रुळ किंवा पुलांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्यास संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक तात्काळ थांबविण्याची तयारी करण्यात आली आहे. पाण्याची पातळी वाढल्याचे किंवा रेल्वे मार्गाच्या सुरक्षिततेशी तडजोड झाल्याचे आढळल्यास गाड्या थांबविण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. प्रसिद्धीपत्रकानुसार, पूरस्थितीमुळे रेल्वे रुळ आणि पुलांचे संभाव्य नुकसान टाळण्यासोबतच प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करण्याला प्राधान्य देण्यात आले आहे. परिस्थिती गंभीर झाल्यास जीवित तसेच मालमत्तेची हानी टाळण्यासाठी रेल्वे वाहतूक तातडीने नियंत्रित केली जाईल, असे पूर्व मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.