नेपाळमध्ये पुन्हा जलप्रलय?

शास्त्रज्ञांचा इशारा

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
काठमांडू,
Floods again in Nepal नेपाळ-चीन सीमेवरील पर्वतीय भागात नदीचा प्रवाह रोखणारा अडथळा अद्याप कायम असल्याने नेपाळला पुन्हा एकदा मोठ्या पुराचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) या काठमांडूस्थित आंतर-सरकारी संस्थेने हा इशारा दिला आहे. ही संस्था हिंदुकुश हिमालयीन प्रदेशातील भारत, नेपाळ, भूतान, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तान या आठ देशांमध्ये कार्यरत आहे.२६ ऑगस्ट रोजी आलेल्या अचानक पुरामागील नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी आणि शास्त्रज्ञ तपास करत आहेत. या आपत्तीमुळे भविष्यात पुन्हा कोणता धोका निर्माण होऊ शकतो, याचाही अभ्यास केला जात आहे. भोटे कोशी आणि त्रिशुली नदी प्रणालीच्या आसपास राहणाऱ्या नागरिकांना अद्याप धोका कायम असल्याचे ICIMOD ने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संभाव्य पूरस्थिती लक्षात घेता संवेदनशील भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासह परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे.

Floods again in Nepal 
 
 
ICIMOD च्या हवामान आणि पर्यावरणीय जोखीम विभागाचे प्रमुख कियांगगोंग झांग यांनी या परिस्थितीबाबत गंभीर इशारा दिला आहे. त्यांच्या माहितीनुसार, रसुवा परिसरातील गेल्या वर्षी पुरामुळे बाधित झालेला भाग पुन्हा धोक्याच्या स्थितीत आहे. लेंडी खोला नदीत बर्फाचे हिमस्खलन झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असावी, असा प्राथमिक संशय आहे. मात्र, पुराचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. नेपाळ-चीन सीमेवरील नदीच्या वरच्या भागात काही अडथळे कायम असल्याने दुसऱ्या पुराची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.गेल्या वर्षीही याच परिसराला पुराचा फटका बसला होता. ICIMOD च्या शास्त्रज्ञांच्या मते, २०२४ मध्ये महापुराने प्रभावित झालेल्या खोऱ्यात पुन्हा परिस्थिती गंभीर बनली आहे. याशिवाय नुवाकोट आणि धाडिंग जिल्ह्यांमधील नदीच्या खालच्या प्रवाहातील भागांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे ९ वाजता भोटे कोशी खोऱ्यात पाण्याची पातळी अचानक वेगाने वाढली आणि पुराचा प्रवाह सुरू झाला. भोटे कोशी नदीचे पाणी त्रिशुली नदी प्रणालीमध्ये पोहोचले. गलची येथे अवघ्या ३० मिनिटांत त्रिशुली नदीची पाणीपातळी तब्बल नऊ मीटरने वाढली. त्याच कालावधीत मालेखु येथे नदीची पाणीपातळी सात मीटरने वाढल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. अल्पावधीत झालेली ही मोठी वाढ नदीच्या वरच्या भागातून पाणी आणि मोठ्या प्रमाणावर मलबा अचानक खाली आल्याचे संकेत देत आहे.या पुरामागे नेमके काय कारण आहे, याचा शास्त्रज्ञांकडून विविध शक्यतांच्या आधारे शोध घेतला जात आहे. पर्वताच्या उंच भागात बर्फ आणि खडकांचे मोठे हिमस्खलन झाले असावे, हा त्यापैकी एक प्रमुख अंदाज आहे. व्हिडिओ आणि बाधित भागातून मिळालेल्या माहितीनुसार, बर्फ व खडकांचा मोठा ढिगारा भोटे कोशीची उपनदी असलेल्या लेंढे खोला नदीत कोसळला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी विस्थापित होऊन शक्तिशाली लाट निर्माण झाली असावी. या लाटेसोबत खडक, गाळ आणि इतर ढिगारा वेगाने नदीच्या खालच्या भागात वाहून गेला असण्याचा अंदाज आहे.
 
 
याशिवाय भूस्खलनामुळे नदीच्या प्रवाहात तात्पुरता अडथळा निर्माण होऊन नैसर्गिक धरण तयार झाले असण्याची शक्यताही तपासली जात आहे. हिमस्खलनातून आलेला ढिगारा नदीच्या अरुंद भागात साचल्यास त्यामागे मोठ्या प्रमाणात पाणी जमा होऊ शकते. हा अडथळा अचानक तुटल्यास पाण्याचा मोठा प्रवाह पुन्हा खालीच्या भागात येऊ शकतो. नदीच्या वरच्या भागातील अडथळा अद्याप कायम असण्याची शक्यता असल्याने दुसऱ्या पुराचा धोका अधिक गंभीर मानला जात आहे.ICIMOD मधील आपत्ती जोखीम निवारण तज्ज्ञ शशवत सन्याल यांनी सांगितले की, गेल्या १४ महिन्यांत लेंढे खोला नदीला दोन वेळा पूर आला आहे. यावेळी हिमस्खलनामुळे नदीचा प्रवाह अडला असावा आणि त्यानंतर खालच्या भागात पाण्याचा प्रवाह अचानक वाढला असण्याची शक्यता आहे. मात्र, या कारणाची अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.