पुलगाव,
Fuel tanker overturns in Wardha नागपूर-मुंबई एक्सप्रेस हायवेवरील पुलगाव-अमरावती मार्गावर हॉटेल जयदेव बारसमोर गुरुवारी सायंकाळी सुमारे ६.३० ते ७ वाजण्याच्या दरम्यान नायरा कंपनीचा पेट्रोल आणि डिझेलने भरलेला टँकर पलटी झाला. ज्वलनशील इंधनाने भरलेला टँकर रस्त्यावर उलटल्याने परिसरात मोठा धोका निर्माण झाला होता.घटनेची माहिती मिळताच केंद्रीय दारूगोळा डेपो (CAD) पुलगावचे अग्निशमन दल, सुरक्षा अधिकारी आणि सुरक्षा दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आले.
टँकरमधील ज्वलनशील पदार्थामुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी अग्निशमन दलाने घटनास्थळी विशेष खबरदारी घेतली. सुमारे दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर क्रेनच्या मदतीने टँकर उचलण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. अखेर तीन तासांच्या आत बचावकार्य पूर्ण करून टँकर सुरक्षितपणे सरळ करण्यात आला. या अपघातामुळे हायवेच्या दोन्ही बाजूंना सुमारे दोन-दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी झाली होती. टँकर सुरक्षितपणे हटवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. CAD पुलगाव अग्निशमन दल आणि पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.