कारंजा लाड,
gold rosary stolen from jain temple शहरातील भगवान महावीर चौक परिसरातील जैन मंदिर मध्ये भाविकाची सोन्याची जपमाळ चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. चोरीनंतर सदर माळ पुन्हा परत करण्यात आल्याचा दावा करण्यात आला असून, या संपूर्ण प्रकरणाची तातडीने चौकशी करून चोरी करणार्या व्यक्तीचा शोध घ्यावा तसेच चोरीची माहिती लपविण्याचा प्रयत्न करणार्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी संस्थानचे विश्वस्त दिलीप हिरासा राऊळ यांनी कारंजा शहर पोलिसांकडे लेखी कैफियतद्वारे केली आहे.

राऊळ यांनी दिलेल्या तक्रारी नुसार, शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी सकाळी ७ ते १० वाजण्याच्या दरम्यान मंदिरात एका भाविकाची ५४ सोन्याच्या मण्यांची जपमाळ अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचा संशय आहे. या माळेची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. सदर माळ हरवल्याचे संबंधित भाविक व त्यांच्या पत्नीच्या लक्षात संध्याकाळी आले. त्यानंतर त्यांनी मंदिर व्यवस्थापक यांना मोबाईलद्वारे माहिती दिली व मंदिरात प्रत्यक्ष येऊन चौकशी केली. चौकशी सुरू झाल्यानंतर चोरीला गेलेली माळ संबंधितांकडे परत करण्यात आल्याचे मंदिर व्यवस्थापकांना कळविल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मात्र, चोरीची घटना घडल्यानंतर माळ परत कशी मिळाली, ती कोणाकडे होती आणि या संपूर्ण घटनाक्रमामागे नेमके काय घडले, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे विश्वस्त राऊळ यांनी म्हटले आहे. चोरीची माहिती पोलिसांपर्यंत जाऊ नये म्हणून माळ परत करण्यात आली असावी, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
मंदिरात यापूर्वीही सन २०१८ मध्ये एका महिला भाविकाचा मोबाईल चोरीला गेल्याची घटना घडली होती. त्यावेळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचा उल्लेख तक्रारीत केला आहे. मंदिरात भाविकांकडून मोबाईल, चांदीची पूजेची भांडी, सोन्या-चांदीच्या माळा तसेच अन्य मौल्यवान वस्तू आणल्या जातात. त्यामुळे मंदिर परिसरात चोरीच्या घटना घडल्यास भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मंदिरातील लहान सोन्या-चांदीच्या तसेच अष्टधातूच्या मूर्ती आणि पूजेसाठी वापरण्यात येणार्या चांदीच्या वस्तूंच्या सुरक्षेचाही प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेला गांभीर्याने घेत मंदिरातील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करावी, अशी मागणी राऊळ यांनी तक्रारीतून केली आहे.