हरियाणा विधानसभेत काँग्रेसच्या आठ आमदारांचे निलंबन

गोंधळानंतर मार्शलमार्फत सभागृहाबाहेर

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
चंदीगड

Haryana Assembly Monsoon Session हरियाणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या आमदारांनी केलेल्या जोरदार गोंधळामुळे सभागृहातील वातावरण तापले. सातत्याने गोंधळ घातल्याप्रकरणी विधानसभा अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी सुरुवातीला काँग्रेसच्या सहा आमदारांना निलंबित केले. त्यानंतर आणखी दोन आमदारांना निलंबित करण्यात आल्याने एकूण आठ काँग्रेस आमदारांवर कारवाई झाली. निलंबित आमदारांना मार्शलच्या मदतीने सभागृहाबाहेर काढण्यात आले. त्यानंतर दुपारी सुमारे अडीच वाजता विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.
 

Haryana Assembly Monsoon Session: 8 Congress MLAs Suspended After Uproarc 
अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी विकास सहारण, देवेंद्र हंस, गोकुल सेतिया, शकुंतला खटक, आदित्य सुरजेवाला, जस्सी पेटवाड, बलराम दांगी आणि इंदुराज नरवाल यांना ‘नेम’ करण्याची घोषणा केली. त्यानंतर काँग्रेसच्या आमदारांना मार्शलच्या माध्यमातून सभागृहाबाहेर नेण्यात आले. महिला आमदार शकुंतला खटक यांनी बाहेर जाण्यास नकार देत सभागृहातच राहण्याचा आग्रह धरला. अखेर त्यांना बाहेर नेण्यासाठी महिला मार्शलला बोलावण्यात आले आणि महिला मार्शलने त्यांना सभागृहाबाहेर नेले.
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सकाळपासूनच काँग्रेस आमदार आणि पोलिसांमध्येही संघर्षाचे वातावरण पाहायला मिळाले. सत्राच्या सुरुवातीपूर्वी काँग्रेसच्या आमदारांनी विधानसभेपर्यंत पायी मोर्चा काढला. यावेळी आमदारांनी काळे कपडे परिधान केले होते आणि विविध मागण्यांसंदर्भातील घोषणा लिहिलेल्या फलक त्यांच्या हातात होते. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हे फलक विधानसभेच्या आवारात नेण्यास मज्जाव केला. त्यावरून पोलीस आणि काँग्रेस आमदारांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. या दरम्यान माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते भूपेंद्र सिंह हुड्डा हे एका पोलीस कर्मचाऱ्याला कोपराने मारताना दिसून आले.
या घटनेवर भूपेंद्र सिंह हुड्डा यांनी सरकारवर कडाडून टीका केली. जंतर-मंतर असो किंवा विधानसभा मोर्चा, देशातील प्रत्येक नागरिकाला आणि लोकप्रतिनिधीला आपले म्हणणे मांडण्याचा घटनात्मक अधिकार आहे, असे त्यांनी म्हटले. आमदारांवर आणि स्वतःवर ज्या पद्धतीने पोलिसांकडून धक्काबुक्की करण्यात आली, ते संविधान आणि लोकशाहीविरोधी असल्याचे त्यांनी सांगितले. सरकारने पोलिसांच्या वर्दीत गुंड पाठविल्यासारखे वाटत असल्याचा गंभीर आरोपही हुड्डा यांनी केला.
 
 
काँग्रेस आमदारांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा स्थगित करावे लागले. पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीची तक्रार काँग्रेस आमदारांनी सभागृहात केली. त्यावर अध्यक्ष हरविंदर कल्याण यांनी संपूर्ण प्रकरणाची माहिती घेऊन व्हिडिओ फुटेज तपासण्याचे आश्वासन दिले. ‘आपण माझ्या चेंबरमध्ये या, संपूर्ण प्रकरण वैयक्तिकरीत्या पाहतो,’ असे अध्यक्षांनी सांगितले. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस आमदार फलक घेऊन विधानसभेत प्रवेश करत असल्याने त्यांना रोखण्यात आल्याचेही अध्यक्षांनी स्पष्ट केले.दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस आमदार रघुबीर कादयान यांनी आमदारांच्या विशेषाधिकाराचा भंग तसेच त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचा आरोप केला. दुसरीकडे मंत्री महिपाल ढांडा यांनी काँग्रेस आमदारांनी कर्मचाऱ्यांशी अत्यंत चुकीचे वर्तन केल्याचा आरोप करत काँग्रेसचे आमदार नियंत्रणाबाहेर गेल्याचे म्हटले.
या संपूर्ण गोंधळाच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षांनी काँग्रेसच्या आठ आमदारांना निलंबित केले आणि त्यांना मार्शलमार्फत सभागृहाबाहेर काढण्यात आले. अखेर दुपारी सुमारे अडीच वाजता विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले.