नेपाळनंतर आता भारतातही आभाळाचा कहर! महाराष्ट्रासह अनेक राज्यांवर संकटाचे ढग

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
मुंबई
imd weather alert नेपाळमध्ये महापुराने हाहाकार माजवला असतानाच भारतातही मान्सून सक्रिय झाला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील अनेक भागांमध्ये हवामान बदलण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने २७ ऑगस्टसाठी दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब आणि महाराष्ट्रासह पूर्वोत्तर राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही भागांत वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता असून, डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका व्यक्त करण्यात आला आहे. विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
 

imd weather alert heavy rain and strong winds forecast across india on august 27 
२७ ऑगस्ट रोजी दुपारनंतर अचानक हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. दिल्लीसह मध्य भारतातील काही भागांमध्ये मुसळधार पावसासोबत सोसाट्याचे वारे वाहू शकतात. या काळात वाऱ्याचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारला विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नेपाळमधील पुराचा फटका बिहारमधील सात ते आठ जिल्ह्यांना बसण्याची शक्यता असून, या भागांतही पावसाचा जोर वाढू शकतो. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येण्याचा धोका निर्माण झाला आहे.
झारखंड आणि मध्य प्रदेशासह उत्तर भारतातील हवामानातही बदल होण्याची शक्यता आहे. आसामसह पूर्वोत्तर भागात ढगांची दाटी होत असून, बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलांचा परिणाम देशाच्या मध्य आणि उत्तर भागावर होण्याची शक्यता आहे. काही भागांत गारपीट होण्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अत्यावश्यक काम नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळावे, असा सल्लाही काही भागांत देण्यात आला आहे.
पूर्वोत्तर भारतातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आसामसह सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि इतर पूर्वोत्तर राज्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. या भागांत वादळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्येही दमदार पाऊस पडू शकतो. त्यामुळे नदीकाठच्या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील अनेक राज्यांमध्येही मान्सून सक्रिय राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राबरोबरच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, लक्षद्वीप तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूतील पश्चिम घाटालगतच्या जिल्ह्यांमध्ये पुढील आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. मदुराई, शिवगंगा आणि रामनाथपूरम भागात पुढील २४ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
देशातील विविध भागांमध्ये पावसासोबत वादळी वारे आणि विजांचा धोका लक्षात घेता नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः नदीकाठचे, सखल आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे.