वॉशिंग्टन,
Insta and Facebook down after midnight अमेरिकेत मुलांच्या सोशल मीडिया वापरावरून मेटाविरोधात सुरू असलेल्या कायदेशीर वादात मोठी तडजोड झाली आहे. या करारानुसार १८ वर्षांखालील मुलांसाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर मिळून दररोज दोन तासांची डीफॉल्ट वापर मर्यादा ठेवली जाणार आहे. तसेच मध्यरात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत दोन्ही ॲप्स वापरता येणार नाहीत. ही मर्यादा वाढवण्यासाठी पालकांची परवानगी आवश्यक असेल.याशिवाय सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत नोटिफिकेशन्स डीफॉल्टनुसार म्यूट ठेवली जातील. वय पडताळणी अधिक कठोर करण्यासोबतच पालकांसाठी पॅरेंटल कंट्रोल्स सोपे केले जाणार आहेत. मुलांना नियमित विश्रांती घेण्याची आठवण करून देणारी स्मरणपत्रे दाखवली जातील, तर सार्वजनिक लाइक्सची संख्या आणि काही ब्युटी फिल्टर्सवरही निर्बंध आणले जाणार आहेत.
अमेरिकेतील अनेक राज्यांच्या ॲटर्नी जनरलनी २०२३ मध्ये मेटाविरोधात खटला दाखल केला होता. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील काही फीचर्समुळे मुलांचा सोशल मीडिया वापर वाढत असल्याचा आणि त्याचा मानसिक व शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात मेटाकडून अंदाजे १७ अब्ज डॉलर्सची तडजोड केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, कंपनीने कोणतीही चूक किंवा कायदेशीर जबाबदारी मान्य केलेली नाही. या कराराला कॅलिफोर्नियाच्या फेडरल कोर्टाची अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. मेटाने २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत या तडजोडीसाठी अंदाजे १० अब्ज डॉलर्सचा कायदेशीर खर्च नोंदवण्याचे म्हटले आहे. मुलांच्या ऑनलाइन सुरक्षेबाबत यूट्यूब आणि टिकटॉकनेही अशाच उपाययोजना कराव्यात, अशी अट तडजोडीत ठेवण्यात आली आहे.