कारंजा तालुका कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर

महिनाभराच्या पावसाच्या खंडाने खरीप पिके होरपळली

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
कारंजा लाड,
karanja taluka वरुणराजाच्या प्रतीक्षेत असलेल्या कारंजा तालुयातील शेतकर्‍यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या पावसाच्या जोरावर मोठ्या आशेने पेरणी केलेल्या पिकांना आता पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा फटका बसू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून तालुयात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतातील ओलावा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी कळी व फुलोर्‍याच्या निर्णायक अवस्थेत असलेले सोयाबीन सुकण्यास सुरुवात झाली असून कारंजा तालुका आता कोरड्या दुष्काळाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
 
karanja taluka
 
कारंजा तालुयात यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी करण्यात आली आहे. सुमारे ५० हजार हेटर क्षेत्रावरील सोयाबीन सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पिकाची वाढ चांगली झाल्यानंतर कळी आणि फुलोर्‍याच्या अवस्थेत पोहोचलेल्या सोयाबीनला आता पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र नेमया याच काळात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकावर संकट कोसळले आहे.सोयाबीनच्या वाढीच्या दृष्टीने कळी व फुलोरा हा अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला जातो. या काळात पाण्याचा ताण निर्माण झाल्यास फुलगळ होणे, शेंगा कमी लागणे, झाडांची वाढ खुंटणे तसेच दाणे भरण्याची प्रक्रिया प्रभावित होण्याची शयता असते. सध्या अनेक शेतांमध्ये सोयाबीनची पाने मलूल होत असून काही भागात झाडे सुकण्यास सुरुवात झाली आहे.शेतकर्‍यांनी मोठ्या खर्चाने शेताची मशागत करून बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर पैसा खर्च केला. पिकाची सुरुवातीची अवस्था समाधानकारक असल्याने यंदा चांगले उत्पादन मिळेल, अशी आशा निर्माण झाली होती. मात्र आता पावसाच्या खंडाने ही आशाच मावळताना दिसत आहे.
 
 
तालुयातील हजारो शेतकरी सोयाबीनवर अवलंबून आहेत. सोयाबीन हे केवळ एक पीक नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे. या पिकाच्या उत्पादनावर शेतकर्‍यांचे कर्जफेडीचे नियोजन, घरखर्च, मुलांचे शिक्षण, पुढील हंगामासाठीची तयारी आणि इतर आर्थिक व्यवहार अवलंबून असतात. मात्र सध्या ५० हजार हेटरवरील सोयाबीन पिकाला पावसाची नितांत गरज असताना आकाश ढगाळ राहून सुद्धा पाऊस येत नसल्याने शेतकर्‍यांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. आणखी काही दिवस पाऊस लांबला तर उत्पादनात मोठी घट होण्याची शयता असून काही भागात उत्पादनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.सोयाबीनसोबतच अल्पमुदतीच्या मूग आणि उडीद पिकांनाही पावसाच्या खंडाचा मोठा फटका बसत आहे. तालुयातील हजारो हेटरवरील मूग-उडीद पिके आता पाण्याअभावी धोयात आली आहेत. या पिकांचा कालावधी कमी असल्याने त्यांना योग्य वेळी पाऊस मिळणे अत्यावश्यक असते.पावसाचा खंड वाढल्याने या पिकांची वाढ खुंटण्याबरोबरच फुलोरा व शेंगा धरण्यावर परिणाम होण्याची शयता आहे. काही ठिकाणी पिके पिवळी पडू लागल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अल्पमुदतीच्या पिकांचे उत्पादनही घटण्याची भीती निर्माण झाली आहे.
 
यंदा शेतकर्‍यांसमोर सुरुवातीपासूनच अनेक अडचणी होत्या. महागडी मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके आणि मजुरीचा वाढता खर्च यामुळे खरीप हंगामासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक करावी लागली. कर्ज काढून अथवा उधारीवर शेतीचा खर्च भागविणार्‍या शेतकर्‍यांनी पिकाच्या उत्पन्नावर सर्व आशा ठेवली होती.आता मात्र पाऊसच गायब झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. उभे पीक वाचविण्यासाठी काय करावे, हा प्रश शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे. विहीर, बोअर किंवा इतर सिंचनाची सुविधा असलेल्या काही शेतकर्‍यांना मर्यादित प्रमाणात पाणी देता येत असले तरी बहुतांश कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी आकाशातील पावसाशिवाय पर्याय नाही.आणखी पाऊस लांबल्यास नुकसानीचे प्रमाण झपाट्याने वाढू शकते.त्यामुळे प्रशासनाने तालुयातील पिकांची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करून पीक परिस्थितीचा अहवाल तयार करणे आवश्यक आहे. महसूल, कृषी विभाग आणि संबंधित यंत्रणांनी गावनिहाय पिकांची पाहणी करून पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे.