मुंबई
Maharashtra Auto Taxi Drivers राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी भाषा शिकण्यासाठी आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत त्यांच्यावर मराठी न आल्याच्या कारणावरून कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
हाजी अराफत यांच्या नेतृत्वाखाली ऑटो आणि रिक्षा चालकांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी येणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळाने मान्य केले. तसेच मराठी शिकण्याचे प्रयत्न सुरू असून भविष्यातही ते सुरूच ठेवणार असल्याचे चालकांनी सांगितले. मात्र, वेगवेगळ्या वयोगटातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना कमी कालावधीत मराठी शिकणे शक्य होणार नाही, त्यामुळे त्यासाठी पुरेसा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
किमान जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यानुसार अमराठी रिक्षा आणि ऑटोचालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.या वर्षभराच्या कालावधीत रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही. या काळात संबंधित संघटना क्लासेसच्या माध्यमातून तसेच मराठी साहित्याच्या अभ्यासातून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकवतील. रिक्षाचालक आणि ऑटोचालकांचे शिष्टमंडळ स्वतः पुढे येऊन वेळ वाढवून देण्याची विनंती करत असल्याने त्यांना वेळ देणे आवश्यक होते. त्यानुसार एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या निर्णयामुळे अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, या वर्षभरात त्यांनी जुजबी मराठी शिकावी, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.