महानगरपालिकेच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला चार वर्षांची शिक्षा

- स्वच्छता कर्मचाऱ्याकडून घेतली तीन हजारांची लाच

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,

nagpur municipal corporation महापालिकेच्या एका महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या आरोग्य निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यांतर्गत जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी लाचखोर स्वच्छता निरीक्षक खिलावन गणू राम लांजेवार याला दंडासह चार वर्षांची शिक्षा सुनावली. या घटनेनंतर महापालिकेतील भ्रष्टाचार समोर आला होता, हे विशेष.
 

Nagpur Bribe Case :nagpur municipal corporation Inspector Gets 4-Year Jail Term 
एक महिला सफाई कर्मचारी काही दिवस कामावर गैरहजर होती. तिचा पगार काढण्यासाठी आरोपी लाचखोर स्वच्छता निरीक्षक खिलावन गणू राम लांजेवार याने चार हजार रुपये लाच मागितली होती. तक्रारदार महिलेला लाच रक्कम द्यायची नसल्यामुळे तिने २०१५ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपीने चार हजारांपैकी तीन हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली होती. त्याचवेळी एसीबीने लांजेवारला लाच घेताना रंगेहात पकडले होते. या गुन्ह्याचा संपूर्ण तपास झाल्यानंतर हा खटला शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी चालवला. शासनाच्यावतीने या खटल्यात एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पंच साक्षीदार, तपास अधिकारी आणि सक्षम अधिकारी या सर्वांच्या साक्ष ग्राह्य धरून न्यायाधीश एस. एच. ग्वालानी यांनी आरोपी खिलावन लांजेवार याला कलम ७ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास) तसेच कलम १३ (१) (ड) लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अन्वये चार वर्षे सश्रम कारावास आणि दहा हजार रुपये दंड (दंड न भरल्यास अतिरिक्त सहा महिने कारावास) अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात शासनाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील अभय जिकार यांनी कामगिरी केली.