अनिल कांबळे
नागपूर,
insurance claim दुचाकीच्या अपघातात मुलाच्या मृत्यूप्रकरणात विमा कंपनीने १५ लाख रूपये दिले नाही. त्यामुळे नागपुरातील स्थायी लोक अदालतीने रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीला १५ दिवसांत विमा दावा निकाली काढण्याचे आदेश दिले. तसेच दावा निकाली न काढल्यास विमा रक्कम १५ लाख रूपये खर्चासह अर्जदार वृध्द महिलेला द्यावे लागतील, असाही इशारा स्थायी लोक अदालतीने कंपनीला दिला आहे. स्थायी लोक अदालतचे अध्यक्ष न्यायाधीश दीपक भेंडे तथा सदस्या प्रतिभा अनकर व अर्चना बागडे यांनी हा निर्णय दिला आहे.
अर्जदार मीरा गुलसिंग भलावी (७८, रा. सुवर्धरा, ता. पारशिवणी जि. नागपूर ) यांचा मुलगा अभिषेक गुलसिंग भलावी यांनी मे २0२५ मध्ये हिरो कंपनीची मोटरसायकल दुचाकी खरेदी केली होती. या दुचाकीचा १५ लाख रुपयांचा विमा कंपनीकडून काढला होता. १९ आॅक्टोबर २0२५ रोजी या दुचाकीच्या अपघातात अभिषेक यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मीरा यांनी विमा कंपनीला विनंती केली की, त्यांना विम्याचे १५ लाख रुपये देण्यात यावे. परंतु विमा कंपनीने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे २१ जानेवारी २0२६ रोजी त्यांनी स्थायी लोक अदालतमध्ये याचिका दाखल केली. याप्रकरणी लोक अदालतीने विमा कंपनीला नोटीस पाठविली होती. परंतु नोटीस मिळून देखील कंपनीकडून कोणी हजर झाले नाही. त्यामुळे संपूर्ण दस्तऐवज लक्षात घेता व कायदेशीर बाजू विचारात घेता न्यायाधीश दीपक भेंडे, सदस्या प्रतिभा अनकर व अर्चना बागडे यांनी आदेश दिले की, विमा कंपनीने आदेशाची प्रत मिळाल्यापासून १५ दिवसांच्या आत अर्जदार मीरा भलावी यांचा दावा निकाली काढावा , अन्यथा विमा रक्कम १५ लाख दहा हजार रुपये खर्चासह एक महिन्यात द्यावे. या प्रकरणात याचिका दाखल करण्याकरिता अर्जदार मीरा भलावी यांना एक रुपयाही कोर्ट फी भरावी लागली नाही. तसेच सात महिन्यांमध्ये निकाल लागला ,हे येथे विशेष.