फुटाळा पुलाखालील अरुंद रस्ता ठरतोय धोकादायक

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नागपूर,
narrow road under phutala bridge अमरावती रोडवरील धरमपेठ भोले पेट्रोल पंप चौक ते फुटाळा चौकादरम्यान उड्डाणपूल उभारण्यात आला आहे. या उड्डाणपुलामुळे पुलाखालील मुख्य रस्ता डाव्या आणि उजव्या बाजूने अरुंद झाला असून, पुढे फुटाळा वस्तीकडे जाणाऱ्या चढाईच्या मार्गावर रस्ता आणखी अरुंद होतो. या मार्गावर सातत्याने ट्रक आणि बसची वर्दळ असल्याने वाहतूक धोकादायक बनली आहे.
 
narrow road under phutala bridge
 
डाव्या बाजूला इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाच्या कार्यालयापासून मेघना पुष्पलता तिडके यांच्या मेनगेटपर्यंत केवळ जवळपास १० फूट रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या उंच सुरक्षा भिंतीमुळे तसेच अंदाजे ५ फूट जागा दगडी बांधकामाने व्यापल्याने वाहतुकीसाठी उपलब्ध जागा आणखी कमी झाली आहे. हे बांधकाम हटविल्यास रस्ता काही प्रमाणात रुंद होऊ शकतो, अशी नागरिकांची भूमिका आहे.
 
उजव्या बाजूलाही रस्ता अरुंद असल्याने फुटाळा वस्तीतील रस्त्यालगतची घरे आणि रहिवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अरुंद मार्गावरून अवजड वाहने आणि बसची सतत ये-जा सुरू असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मनपा प्रशासन, संबंधित झोनल कार्यालय, नगरसेवक आणि रस्ते विभागाने तातडीने पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे. वाहतुकीसाठी अधिक जागा उपलब्ध करून देत हा मार्ग अपघातमुक्त करण्यासाठी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सौजन्य: प्रभुदास रामटेके, संपर्क मित्र