नेपाळ
Nepal Flood नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरामुळे बंगाली अभिनेते खराज मुखर्जी आणि त्यांची पत्नी प्रतिभा नेपाल तेथेच अडकले आहेत. मात्र, दोघेही सुरक्षित असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. खराज मुखर्जी हे बंगाली चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते असून त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘कहानी’, ‘स्पेशल 26’, ‘द नेमसेक’, ‘एक्सीडेंट’, ‘मुक्तोधारा’ आणि ‘जातिश्वर’ या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या आहेत. हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी ‘युवा’, ‘परिणीता’, ‘लगा चुनरी में दाग’ आणि ‘लफंगे परिंदे’ या चित्रपटांत भूमिका साकारल्या आहेत.
खराज मुखर्जी २० ऑगस्ट रोजी पत्नी तसेच बांगलादेशी चित्रपटाच्या प्रॉडक्शन टीमसोबत नेपाळला गेले होते. या समूहात कुटुंबातील सदस्य आणि मित्रांचाही समावेश होता. नेपाळमधील परिस्थिती बिकट असतानाही खराज हे कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, कठीण परिस्थितीतही खराज यांनी फोनवर संपर्क साधून आपण सुरक्षित असल्याचे सांगितले आहे.
या समूहात असलेले अभिनेते रजताभ दत्ता हे देखील नेपाळमध्ये अडकले आहेत. तेही सुरक्षित असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
दरम्यान, खराज मुखर्जी आणि त्यांच्या समूहाने काठमांडूहून विमानाने भारतात परतण्याची तयारी केली होती. मात्र, नेपाळमधील बिघडलेल्या परिस्थितीमुळे सध्या हवाई प्रवास करणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता रस्त्याने उत्तर प्रदेशातील गोरखपूरपर्यंत जाण्याची योजना आखण्यात आली आहे. गोरखपूरहून कोलकात्याकडे विमानाने रवाना होण्याची शक्यता आहे.
नेपाळमध्ये अचानक आलेल्या भीषण पुरामुळे परिस्थिती गंभीर बनली असून मृतांचा आकडा १७७ वर पोहोचला आहे. हजारो बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्याचे प्रयत्न अधिकारी करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता असलेल्या व्यक्तींमध्ये सुमारे ३०० भारतीय पर्यटकांचाही समावेश आहे.
या नैसर्गिक आपत्तीबद्दल पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी चिंता व्यक्त केली आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांप्रति त्यांनी संवेदना व्यक्त केल्या. नातेवाईक, मित्र आणि प्रियजन गमावलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे म्हटले. तसेच नेपाळ आणि या आपत्तीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी प्रार्थना करत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पश्चिम बंगाल सरकार नेपाळमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. पुरामुळे प्रभावित झालेल्या पश्चिम बंगालमधील पर्यटक, यात्रेकरू, कामगार आणि व्यावसायिकांना मदत मिळावी यासाठी राज्य सरकार काठमांडूतील भारतीय दूतावास तसेच नेपाळी अधिकाऱ्यांशी समन्वय साधत असल्याचे शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले.