बिहार
nepal heavy rain नेपाळमधील डोंगराळ भागासह वरच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती निर्माण झाली आहे. नेपाळमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने भारतातील बिहार राज्यावर पुन्हा एकदा पुराचे संकट घोंघावत आहे. तिबेटमधून उगम पावणाऱ्या भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत अवघ्या काही तासांत सुमारे तीन मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे बिहार आणि उत्तर प्रदेशातील काही भागांना महापुराचा धोका निर्माण झाला आहे. गंडक नदीच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असून, नदीत तीन मीटरपर्यंत उंच लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संभाव्य संकटाची गांभीर्याने दखल घेत सीमावर्ती भागात युद्धपातळीवर आपत्कालीन उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत.
परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बिहारचे मुख्य सचिव प्रत्यय अमृत यांनी उच्चस्तरीय बैठक घेतली. दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक सहभागी झाले होते. गंडक नदीतील वाढता पाण्याचा दबाव लक्षात घेता पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर आणि वैशाली या सहा जिल्ह्यांमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय सीतामढी आणि शिवहर जिल्ह्यांतील प्रशासनालाही चोवीस तास सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
नदीतील पाण्याचा वाढता दबाव नियंत्रित करण्यासाठी जलसंपदा विभागानेही तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. वाल्मिकीनगर येथील गंडक बंधाऱ्याचे सर्व ३६ दरवाजे उघडण्यात आले असून, त्याला जोडलेल्या उपकालव्यांमध्येही पाणी सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुराच्या पाण्यामुळे कमकुवत बंधारे फुटू नयेत किंवा त्यांची धूप होऊ नये, यासाठी जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अभियंते आणि कर्मचारी चोवीस तास घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.
तिबेटमध्ये सकाळी नऊच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर भोटेकोशी नदीच्या पाणीपातळीत सुमारे तीन मीटरची वाढ झाली. ही नदी पुढे त्रिशूली नदीच्या खोऱ्याला मिळते आणि त्रिशूली ही गंडक नदी प्रणालीचा महत्त्वाचा भाग आहे. नेपाळमधील भोटेकोशीचे पाणी त्रिशूली नदीमार्गे पुढे भारतातील गंडक आणि कोशी नदी प्रणालीत येत असल्याने बिहारमध्ये पुराचा धोका वाढला आहे. त्यामुळे आगामी काही तासांत गंडक नदीच्या पात्रातील पाण्याचा विसर्ग आणि पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची विशेष पथके बेतिया आणि गोपालगंज येथे पाठवण्यात आली असून, मुझफ्फरपूरमध्ये एक पथक राखीव ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची पथके आणि सशस्त्र सीमा बलाचे जलद प्रतिसाद पथकही कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाता सतर्क राहण्याचे तसेच सखल भागातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन केले आहे.
नेपाळमधील परिस्थितीचा परिणाम बिहारपुरता मर्यादित राहण्याची शक्यता नसून उत्तर प्रदेशातील सीमावर्ती भागातही सतर्कता वाढवण्यात आली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराजगंज आणि कुशीनगर या सीमावर्ती जिल्ह्यांच्या प्रशासनाला सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. गंडक नदीच्या पाणीपातळीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासही सांगण्यात आले आहे.
दरम्यान, पाटणा येथील सिंचन भवनमध्ये मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत करण्यात आला आहे. नदीच्या पात्रातील गळती, धूप किंवा तटबंदीचे नुकसान आढळल्यास नागरिकांनी तातडीने १८००-३४५-६१४५ या विनामूल्य क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ०६१२-२२०६६६९ आणि ०६१२-२२१५८५० या दूरध्वनी क्रमांकांवर, तर ७४६३८८९७०६ आणि ७४६३८८९७०७ या भ्रमणध्वनी क्रमांकांवरही माहिती देता येणार आहे.
संभाव्य पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन संबंधित सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील पूल, धोकादायक आणि कमकुवत बंधारे तसेच नदीकाठच्या निवासी भागांची पाहणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पूरग्रस्त आणि सखल भागातील नागरिकांना वेळीच सतर्क करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा रात्रंदिवस कार्यरत आहे.