नेपाळच्या सीमेवर अडकले नागपूरचे ४ नागरिक!

मानसरोवर यात्रेनंतर परतीचा मार्ग बंद

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
दीप्ती राखुंडे 
 
 
नागपूर  
People from Nagpur stranded at the Nepal border नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी महापुराचा भीषण तडाखा कैलास मानसरोवर यात्रेवरून परतणाऱ्या नागपूरकरांना बसला आहे. मानसरोवर परिक्रमा पूर्ण करून काठमांडूकडे जाणाऱ्या नागपूरच्या चार भाविकांचा परतीचा रस्ता महापुरात संपूर्णपणे उद्ध्वस्त झाला असून, हे नागरिक सध्या चीनमधील सागा काउंटी परिसरात सुरक्षित ठिकाणी आहेत. या भीषण संकटाबाबत अडकलेले नागपूरचे शासकीय कंत्राटदार सचिन जिरापुरे यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना या थरारक अनुभवाची आणि परिस्थितीची सविस्तर माहिती दिली. चीनच्या सागा काउंटीत अडकलेल्या या गटात नागपूरचे चार नागरिक आणि गुजरातमधील वडोदरा येथील त्यांचे काही मित्र एकत्र आहेत. यामध्ये स्वावलंबी नगर येथील रहिवासी व शासकीय कंत्राटदार सचिन जिरापुरे, त्यांच्या पत्नी डॉ. रश्मी जिरापुरे (त्वचाशास्त्रज्ञ), रामकूलरचे ओनर राजेश अवचट आणि त्यांच्या काकांचा समावेश आहे.
 
 
People from Nagpur stranded at the Nepal border
 
 
हॉटेल्स आणि रस्ते वाहून गेले'
‘तरुण भारत’शी संवाद साधताना सचिन जिरापुरे यांनी सांगितले की, कैलास मानसरोवरची परिक्रमा पूर्ण केल्यानंतर सर्वजण दारचिनवरून सागा काउंटी येथे पोहोचले. नियोजित वेळापत्रकानुसार, सागा काउंटीवरून क्यिराँग मार्गे थेट काठमांडूला जायचे होते. मात्र, क्यिराँगच्या ५० ते ६० किलोमीटर परिसरातील मुख्य रस्ता, इमिग्रेशन ऑफिस आणि आजूबाजूचा परिसर महापुरात पार वाहून गेला आहे. आम्ही ज्या रस्त्याने आलो, जिथे जिथे थांबलो, जेवण केले आणि इमिग्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली, ते सर्व रस्ते आणि परिसर पूर्णपणे गायब झाले आहेत. रसुवा येथील ज्या हॉटेलमध्ये लहान मुले होती आणि आम्ही मुक्काम केला होता, ते संपूर्ण हॉटेलच वाहून गेल्याचे पाहून मोठा धक्का बसल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 

व्हॉट्सॲप बंद असल्याने वाढली चिंता
चीनच्या हद्दीत व्हॉट्सॲप आणि सोशल मीडिया ॲप्लिकेशन्सवर बंदी असल्यामुळे तसेच नेटवर्कच्या भीषण समस्येमुळे नागपुरातील कुटुंबीयांशी त्वरित संपर्क साधणे कठीण झाले होते. त्यामुळे नागपुरात नातेवाईक आणि मित्रांमध्ये मोठी चिंता पसरली होती. मात्र, कसंबसं संपर्क साधण्यात यश आले असून हे सर्वजण सध्या सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले आहे. क्यिराँगचा पारंपरिक आणि मुख्य मार्ग बंद झाल्यामुळे आता चिनी अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या पर्यायी मार्गाचा विचार केला जात आहे. मात्र, हा नवीन मार्ग अजून पूर्णपणे निश्चित झालेला नाही. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात असून, नागपूरच्या या चारही नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय प्रशासनाकडून वेगाने हालचाली सुरू आहेत.