पोलिसांचा खबऱ्या असल्याच्या संशयातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न

नंदनवन परिसरातील घटना; महिलेसह चार आरोपी अटकेत

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
police informer suspicion पोलिसांसाठी खबरीगिरी करीत असल्याच्या संशयातून एका तरुणाच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून त्याच्यावर चाकूने हल्ला करून हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह चार आरोपींना अटक केली आहे. जखमी अक्षय ऊर्फ पीके वंजारी (३०, रा. शास्त्रीनगर) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सूरज लांजेवार (२५), त्याची आई वंदना विलास लांजेवार (५३, दोघेही रा. शास्त्रीनगर), प्रशांत आकरे (२५) आणि हार्दिक पांडिलवार (२५, रा. लकडगंज) यांचा समावेश आहे. मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास द प्रिझम इमारतीतील सोमरस बारजवळ ही घटना घडली.
 

police informer suspicion young man attacked with chilli powder and knife in nagpur 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अश्विन ऊर्फ सोनू रहांगडाले याचा मित्र अक्षय वंजारी याच्यासोबत सूरजचा वाद होता. सूरजचा भाऊ आकाश लांजेवार याला २१ ऑगस्ट रोजी चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. यामागे अश्विन पोलिसांना माहिती देत असल्याचा सूरजला संशय होता. त्यातूनच सूरजने २५ ऑगस्ट रोजी सकाळी अश्विनला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मंगळवारी रात्री अश्विन आणि अक्षय मित्रांसह सोमरस बारमध्ये बसले होते. अक्षयच्या घरी फोन आल्याने तो बारच्या बाहेर आला. त्याच वेळी वंदनाने त्याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली. त्यानंतर सूरज, प्रशांत, हार्दिक व त्यांच्या साथीदारांनी अक्षयवर धारदार शस्त्राने हल्ला केला. अश्विनने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली आहे. सूरज आणि वंदनाला न्यायालयात हजर केले असता २९ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रशांत आणि हार्दिक यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जखमी अक्षयवर अमली पदार्थांशी संबंधित दोन गुन्हे दाखल असून त्याच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.