सहवाग-द्रविड यांच्या मुलांची U19 संघात एन्ट्री!

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Sehwag and Dravid's sons enter U-19 squad ऑस्ट्रेलियाच्या अंडर-१९ संघाच्या भारत दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय युवा संघांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलिया U19 संघ या दौऱ्यात भारताविरुद्ध ३ वनडे आणि २ मल्टी-डे सामने खेळणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी निवड समितीने स्वतंत्र भारतीय संघ जाहीर केला आहे. तिन्ही वनडे आणि पहिला मल्टी-डे सामना राजकोटमध्ये, तर दुसरा मल्टी-डे सामना अहमदाबादमध्ये होणार आहे.वनडे मालिकेसाठी लक्ष्य रायचंदानीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. यशबर्धन चौहान उपकर्णधार असेल. मात्र मल्टी-डे सामन्यांमध्ये दोघांच्या भूमिकांची अदलाबदल करण्यात आली आहे. या मालिकेत यशबर्धन चौहान कर्णधार, तर लक्ष्य रायचंदानी उपकर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे.
 
 


Sehwag and Dravid 
 
वनडे संघात माजी भारतीय सलामीवीर वीरेंद्र सहवाग याचा मुलगा आर्यवीर सहवाग आणि माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड याचा मुलगा अन्वय द्रविड यांची निवड झाली आहे. अन्वयचा संघात यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. मात्र या दोघांनाही मल्टी-डे संघात स्थान मिळालेले नाही. आर्यवीरने यंदाच्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये वेस्ट दिल्ली लायन्सकडून खेळ केला होता.वनडे संघात लक्ष्य रायचंदानी, यशबर्धन चौहान, रजत बघेल, आर्यवीर सहवाग, व्ही.के. विनीत, कुशाग्र ओझा, अर्जुन राजपूत, मनाल चौहान, अन्वय द्रविड, व्ही. यशवीर, रोहित यादव, शाविन विनोद, मोहित उलवा, चिगुरुपति वेंकट आणि काव्या पटेल यांचा समावेश आहे.
 
 
मल्टी-डे सामन्यांसाठी यशबर्धन चौहान, लक्ष्य रायचंदानी, सागर विर्क, कुशाग्र ओझा, मनाल चौहान, कुश पटेल, मानव कृष्णा, अभिप्राय विश्वास, रोहित यादव, इशान ओम, अयान अकरम, प्रणव राघवेंद्र, प्रियांशु सिंह, मोहित उलवा आणि आर्यन यादव यांची निवड करण्यात आली आहे. मानव कृष्णा आणि अभिप्राय विश्वास हे दोघे यष्टिरक्षक म्हणून संघात आहेत.ऑस्ट्रेलिया U19 संघाच्या भारत दौऱ्याची सुरुवात १८ सप्टेंबर २०२६ रोजी वनडे सामन्याने होईल. हा सामना राजकोटमध्ये सकाळी ९ वाजता सुरू होईल. त्यानंतर २१ सप्टेंबरला दुसरा आणि २३ सप्टेंबरला तिसरा वनडे राजकोटमध्येच खेळवला जाणार आहे. दोन्ही सामने सकाळी ९ वाजता सुरू होतील. मल्टी-डे मालिकेतील पहिला सामना २७ ते ३० सप्टेंबरदरम्यान राजकोटमध्ये सकाळी ९.३० वाजता खेळवला जाईल. त्यानंतर दुसरा मल्टी-डे सामना ५ ते ८ ऑक्टोबरदरम्यान अहमदाबाद बी ग्राउंडवर होणार असून, सामन्याला सकाळी ९.३० वाजता सुरुवात होईल.