आईला शिवीगाळ करणाऱ्या मद्यपी भावाचा खून

कळमन्यातील थरारक घटना

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
Shocking Incident in Kalamna दारू पिऊन घरी आल्यानंतर आईला शिवीगाळ करून चाकूने मारण्याची धमकी देणाऱ्या मोठ्या भावाचा त्याच्याच लहान भावाने चाकूने भोसकून खून केला. ही दुर्दैवी घटना कलमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाचझोपडी या परिसरात घडली. या प्रकरणी कलमना पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे. मृताचे नाव मोहन चिंताराम बांते (२१) असून आरोपीचे नाव समीर चिंताराम बांते (१९) आहे. दोघेही सख्खे भाऊ असून ते पाचझोपडी, मिनीमाता नगर परिसरात राहत होते.
 

Shocking Incident in Kalamna Drunken Brother Who Abused Mother Stabbed to Death by Younger Sibling 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनला दारूचे व्यसन होते. तो नेहमी नशेत राहत होता. दारू पिण्यासाठी पैसे मिळावेत म्हणून तो आई-वडिलांकडे पैशांची मागणी करायचा. पैसे देण्यास नकार दिल्यास तो आई-वडिलांना शिवीगाळ करून त्यांच्याशी वाद घालत होता. घटनेच्या दिवशी रात्री सुमारे ९ वाजता मोहन कामावरून घरी परतला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने आईला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली आणि दारू पिण्यासाठी पैसे मागितले. आईने पैसे देण्यास नकार दिल्याने मोहनने घरातील सामान बाहेर फेकण्यास सुरुवात केली. मोहनचा हा प्रकार पाहून त्याचा लहान भाऊ समीर मध्यस्थी करण्यासाठी आला. मात्र, मोहनने त्यालाही शिवीगाळ करून चाकूने मारण्याची धमकी दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या समीरने चाकूने मोहनवर सपासप वार केले. या हल्ल्यात मोहनच्या हातावर, पोटावर, पाठीत आणि मानेजवळ गंभीर जखमा झाल्या. गंभीर जखमी मोहनला शेजाऱ्यांनी तातडीने मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी आरोपी समीरला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मोठ्या मुलाचा खून लहान जेलमध्ये तर आईवडिल बेसहारा
मोठा मुलाचा लहान मुलाने खून केला. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली. त्याची आता कारागृहात रवानगी होईल. त्यामुळे वृद्ध आईवडिलांवर बेसहारा राहण्याची वेळ आली. वृद्धत्वामुळे पती-पत्नी घरीच असतात. आता त्यांना पुन्हा जीवन जगण्याचा संघर्ष करावा लागणार आहे.