भीषण अपघात; भरधाव ट्रकची बसला धडक, तिघांचा मृत्यू

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
उत्तर प्रदेश
Accident सुल्तानपूरमध्ये गुरुवारी सकाळी पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. प्रवाशांनी भरलेल्या खासगी बसला भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून १६ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच आरडाओरड सुरू झाली.बल्दीराय पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील ९६.५ किलोमीटरच्या ठिकाणी सकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. गुरुग्रामहून बिहारकडे ही खासगी बस प्रवाशांना घेऊन जात होती. त्याचवेळी मागून वेगाने आलेल्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली.
 

Sultanpur Purvanchal Expressway Accident Truck Hits Bus, 3 Killed, 16 Injured 
अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. एसडीएम प्रभात सिंह, बल्दीरायचे क्षेत्राधिकारी आशुतोष कुमार आणि ठाणे प्रभारी महेंद्र प्रताप सिंह यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह बचावकार्य सुरू केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
या दुर्घटनेतील ११ जखमी प्रवाशांना कुमारगंज येथील १०० खाटांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर गंभीर जखमी झालेल्या पाच जणांना पुढील उपचारांसाठी अयोध्या जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृत प्रवाशांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
दरम्यान, बसमधून प्रवास करणाऱ्या घनश्याम तिवारी यांनी बसमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवासी असल्याचा दावा केला असून बस क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांनी भरलेली असल्याचा आरोप केला आहे. प्रशासनाकडून या आरोपाची चौकशी करण्यात येत आहे.
क्षेत्राधिकारी आशुतोष कुमार यांच्या माहितीनुसार, पीआरबीच्या माध्यमातून अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. बचावकार्य पूर्ण केल्यानंतर मृतांच्या संदर्भातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. जिल्हाधिकारी इंद्रजीत सिंह यांनी जखमींवर योग्य उपचार आणि त्यांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. दुर्घटनाग्रस्त वाहने बाजूला हटवण्यात आल्यानंतर पूर्वांचल एक्सप्रेसवेवरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे. दरम्यान, याच महिन्यात देवरिया येथे स्कूल बसने ई-रिक्षाला धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात ई-रिक्षाचालकाचा मृत्यू झाला होता, तर १३ जण जखमी झाले होते.