सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम; टी-२०मध्ये ६५० बळींचा टप्पा

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
पोर्ट ऑफ स्पेन,
Sunil Narine's historic feat वयाच्या ३८व्या वर्षी सुनील नरेनने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. कॅरिबियन प्रीमियर लीग (CPL 2026) मध्ये ट्रिनबागो नाइट रायडर्सकडून खेळताना त्याने सेंट लुसिया किंग्सविरुद्ध टी-२० कारकिर्दीतील ६५०वा बळी घेतला. जॉन कॅम्पबेलची विकेट घेत नरेनने हा ऐतिहासिक टप्पा गाठला. टी-२० क्रिकेटमध्ये ६५० बळी पूर्ण करणारा तो जगातील केवळ दुसरा गोलंदाज ठरला आहे.नरेनने हा विक्रम केला असला तरी त्याच्या संघाला सामन्यात विजय मिळवता आला नाही. टिम सेफर्टच्या १०५ धावांच्या शतकी खेळीच्या जोरावर सेंट लुसिया किंग्सने २११ धावांची मोठी धावसंख्या उभारली. लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रिनबागो नाइट रायडर्सचा डाव १७५ धावांवर थांबला. कायरोन पोलार्डने अवघ्या २६ चेंडूंत ६५ धावांची आक्रमक खेळी केली, मात्र त्याचा संघाला सामना जिंकून देण्यात उपयोग झाला नाही.
 
 
 
आई
 
सुनील नरेनने टी-२० कारकिर्दीतील ६११व्या सामन्यात ६५० बळींचा टप्पा गाठला. यापूर्वी अशी कामगिरी केवळ रशीद खानला करता आली आहे. रशीदच्या नावावर टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ७३६ बळी आहेत. टी-२०मध्ये ७०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा रशीद खान हा एकमेव गोलंदाज आहे. नरेन आणि रशीद यांच्याव्यतिरिक्त ड्वेन ब्राव्होनेच या प्रकारात ६०० बळींचा आकडा पार केला असून त्याच्या नावावर ६३१ बळी आहेत.कॅरिबियन प्रीमियर लीगमध्येही नरेनने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा तो गोलंदाज ठरला असून त्याने ड्वेन ब्राव्होचा १२९ बळींचा विक्रम मागे टाकला आहे. नरेनच्या नावावर सध्या CPLमध्ये १३७ बळी आहेत. त्याच्यामागे इम्रान ताहीर १३५ बळींसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्येही नरेनने महत्त्वाचा विक्रम नोंदवला आहे. आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत २०७ बळी घेतले असून सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएलच्या इतिहासात २०० बळींचा टप्पा गाठणारा तो पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे. या स्पर्धेत सर्वाधिक बळी युझवेंद्र चहलच्या नावावर असून त्याने आतापर्यंत २३३ बळी घेतले आहेत.