विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष ए. बालकृष्ण यांचे निधन

    दिनांक :27-Aug-2026
Total Views |
कन्याकुमारी,
Vivekananda Kendra President A. Balakrishnan passes away विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्राचे अध्यक्ष ए. बालकृष्ण यांचे २७ ऑगस्ट रोजी रात्री १२.०५ वाजता निधन झाले. ३ मे १९३८ रोजी केरळमध्ये जन्मलेल्या बालकृष्ण यांनी आपले संपूर्ण जीवन राष्ट्रसेवा आणि समाजकार्यासाठी समर्पित केले होते. त्यांच्या निधनाने विवेकानंद केंद्राच्या कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. भारतीय वायुसेनेत काही काळ सेवा बजावल्यानंतर बालकृष्ण १९७३ मध्ये विवेकानंद केंद्राच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांच्या पहिल्या तुकडीत सहभागी झाले. एकनाथ रानडे यांच्या प्रेरणेने त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर अरुणाचल प्रदेशात कार्य करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्या काळात १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या परिणामातून अरुणाचल प्रदेश सावरत होता.
 
 
 
Vivekananda Kendra President A. Balakrishnan passes away
 
अरुणाचल प्रदेशात त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून समाजात ज्ञानाचा प्रसार करण्याचे काम केले. विवेकानंद केंद्राच्या ‘मानव निर्माण आणि राष्ट्र निर्माण’ या उद्दिष्टाला पुढे नेण्यासाठी त्यांनी दीर्घकाळ कार्य केले. शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय योगदानाची दखल घेत अरुणाचल प्रदेश सरकारने २०१४ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राज्य पुरस्काराने सन्मानित केले होते. विवेकानंद शिला स्मारक आणि विवेकानंद केंद्राने बालकृष्ण यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांच्या जीवनाला कर्मयोगाचे उदाहरण असल्याचे म्हटले आहे. एकनाथ रानडे यांनी विवेकानंद केंद्राला ‘जीवंत स्मारक’ बनविण्याचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी बालकृष्ण यांनी स्वतःला वाहून घेतले होते. स्वामी विवेकानंद यांचा विश्वबंधुत्व आणि सहिष्णुतेचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासोबतच राष्ट्र आणि समाजसेवेत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले यांनीही ए. बालकृष्ण यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली व्यक्त केली. त्यांच्या साध्या जीवनशैलीचा, निःस्वार्थ सेवाभावाचा आणि त्यागाचा उल्लेख करत त्यांनी बालकृष्ण यांचे कार्य सदैव प्रेरणादायी राहील, असे म्हटले. विवेकानंद केंद्राच्या प्रारंभीच्या जीवनव्रती कार्यकर्त्यांपैकी एक असलेल्या बालकृष्ण यांच्या निधनाने समाजाने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले असून त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण असल्याचेही त्यांनी नमूद केले.