बद्रिनाथ ते रायगड अन् तुंबाड; नागपुरात देखाव्यांची रंगत

राज्य महोत्सवाचा पहिला गणेशोत्सवमंदिरांच्या प्रतिकृतींसह सामाजिक, आध्यात्मिक आणि वैशिष्ट्यपूर्ण थीम

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
नागपूर
पराग मगर
nagpur ganeshostav महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील मानाचा ‘गणेशोत्सव’ यंदापासून ‘राज्य महोत्सव’ म्हणून साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील गणेश मंडळांमध्येही उत्साहाला उधाण आले असून, बाप्पाच्या स्वागतासाठी भव्य देखावे उभारण्याच्या कामाला वेग आला आहे. प्रसिद्ध मंदिरांच्या हुबेहूब प्रतिकृती, ऐतिहासिक किल्ले, आध्यात्मिक संकल्पना, चित्रपटांच्या थीमपासून आधुनिक तंत्रज्ञानाच्या आकर्षक सादरीकरणापर्यंत विविधता यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शहरातील प्रमुख मंडळांच्या देखाव्यांची चर्चा रंगू लागली आहे.
 
ganeshostav
 
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक अभिव्यक्तीचे व्यासपीठ बनला आहे. नागपुरातील मंडळांचीही याच परंपरेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी काहीतरी आगळेवेगळे साकारण्याची चढाओढ मंडळांमध्ये दिसते. देशभरातील प्रसिद्ध मंदिरांच्या प्रतिकृती साकारून त्या मंदिरांची संस्कृती नागपूरकरांपर्यंत पोहोचविण्याची परंपरा अनेक मंडळांनी जपली आहे. यंदा या परंपरेला आधुनिक संकल्पनांची जोड मिळाली आहे.

वैशिष्ट्यपूर्ण देखाव्यांमध्ये काय
इतवारीतील प्रसिद्ध संती गणेश मंडळाकडून यंदा बद्रिनाथ मंदिराची भव्य प्रतिकृती साकारली जात आहे. उत्तराखंडातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राची झलक नागपूरकरांना गणेशोत्सवाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे.
महालातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाने यंदा आळंदी येथील संत ज्ञानेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे भक्ती आणि वारकरी परंपरेचा अनुभव या देखाव्यातून घेता येणार आहे.
भेंडे लेआऊट येथील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळाचा देखावा दरवर्षी आकर्षणाचा विषय ठरतो. यंदा मंडळाकडून आयफेल टॉवरच्या धर्तीवर भव्य प्रवेशद्वार उभारले जाणार असून, सभागृहासाठी ‘विज्ञान-ब्रह्म-आत्मशुद्धी’ अशी संकल्पना मांडण्यात आली आहे.
रामनगर गणेशोत्सव व सांस्कृतिक मंडळाकडून यंदा नृसिंह अवताराचा देखावा साकारला जात आहे.
त्रिमूर्तिनगर येथील सर्वोदय गणेश मंडळाद्वारे ऐतिहासिक रायगड किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यात येत आहे.
बजाजनगर युवक गणेश उत्सव मंडळाकडून यंदा गाजलेल्या ‘तुंबाड’ चित्रपटावर आधारित थीम साकारली जात आहे. या माध्यमातून ‘लालच से ज्ञान की ओर’ असा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
मोदी क्रमांक दोन, सीताबर्डी येथील जयहिंद बाल गणेश मंडळाकडून सप्तशृंगी मंदिराचा देखावा साकारला जात आहे. विशेष म्हणजे संपूर्ण गणेशोत्सवात दररोज देवीचा गोंधळ आयोजित केला जाणार असून, त्यासाठी मंदिरातील गोंधळी सेवेत असणार आहेत.
विवेकानंदनगर गणेशोत्सव मंडळाने यंदा डिस्नीलँडच्या धर्तीवर देखावा उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे बालगोपाळांसह गणेशभक्तांसाठी हा देखावाही विशेष आकर्षण ठरणार आहे.
याशिवाय शहरातील अनेक गणेश मंडळांकडून विविध सामाजिक, धार्मिक, ऐतिहासिक आणि मनोरंजनात्मक संकल्पनांवर आधारित देखावे साकारले जात आहेत. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव नागपूरकरांसाठी देखाव्यांच्या वैविध्याने अधिक रंगतदार ठरणार आहे.
 
कोलकात्याच्या कारागिरांचा हात
भव्य मंडप, बारकाईने केलेली सजावट आणि थीमनुसार देखावा उभारण्यासाठी कुशल कारागिरांची मोठी गरज असते. नागपुरातील मोठ्या गणेश मंडळांच्या देखाव्यांसाठी दरवर्षी कोलकात्याहून विशेष कारागीर बोलावले जातात. मंडपाची रचना, मूर्ती, सजावट, रंगकाम आणि थीमनुसार आवश्यक कलाकुसर करण्यात या कारागिरांचा हातखंडा आहे. यंदाही अनेक मंडळांमध्ये कोलकात्याचे कारागीर दाखल झाले असून, देखाव्यांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील सजावट आणि डेकोरेशन व्यवसायातही चांगलीच लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव जसजसा जवळ येईल, तसतसे शहरातील मंडप आणि देखावे अंतिम रूप धारण करणार असून, गणेशभक्तांना यंदा विविध संकल्पनांचा अनोखा अनुभव घेता येणार आहे.