६५ गावातील शेतकऱ्यांच्या मदतीला २.११ कोटी

१ जून रोजी अवेळी पावसाने झाले होते शेती व फळ पिकांचे नुकसान

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
अकोला
unseasonal-rain-loss यंदा खरिपाच्या सुरुवातील १ जून रोजी झालेल्या अवेळी पावसाने ६५ गावातील १ हजार ८४३ शेतकऱ्यांचे १०३८.१ हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले होते. कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाने केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार ७ ऑगस्ट रोजी २ कोटी ११ लाख १७ हजार मदतीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना जिल्हा प्रशासनाने सादर केला होता.त्याला गुरुवार, २७ रोजी मंजुरी मिळाली असून कापूस, सोयाबीन, तूर या शेतीपिकांसह संत्रा, केळी व पपई या फळपिकांच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
 
rain loss
शेती पिकांमध्ये तेल्हारा तालुक्यातील २४० शेतकऱ्यांचे कापूस, सोयाबीन, तूर पिकांचे १६० हेक्टरवर नुकसान झाले त्यापोटी १३ लाख ६ रुपये मंजूर झाले. फळ पिकांमध्ये आकोट तालुक्यातील २५ गावातील ३५९ शेतकऱ्यांचे ०.६ हेक्टर संत्रा, २५७.८७ केळी, तेल्हारा तालुक्यातील २२ गावातील ११४६ शेतकऱ्यांचे ५०७.८५ हेक्टरवर केळी व ५४.५ हेक्टरवर पपई या सोबतच बाळापुर तालुक्यातील २ गावातील सात शेतकऱ्यांचे ४.७५ हेक्टर केळी, पातूर तालुक्यातील सात गावातील ८८ शेतकऱ्यांचे ५१.३३ हेक्टरवर केळी, बार्शीटाकळी तालुक्यातील एका गावातील ३ शेतकऱ्यांचे १.२ हेक्टरवर केळी पिकांचे नुकसान झाले होते. त्यापोटी १ कोटी ९७ लाख ५७ हजार रुपये मंजूर झाले असून संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सेतू केंद्रावर जाऊन बायोमेट्रिक (अंगठ्याचा ठसा) किंवा आधार लिंक मोबाईलवरील ओटीपी द्वारे प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक असून डिबिटी द्वारे खात्यात थेट मदत जमा होणार आहे.
बँकांना कर्ज खात्यात वसुली करण्यास मनाई
नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना मिळालेला मदतीचा निधी बँकांनी कोणत्याही जुन्या कर्ज खात्यात अथवा इतर कोणत्याही कारणास्तव वसुलीसाठी वळता करू नये, असे स्पष्ट आदेश शासनाने दिले आहेत.जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व बँकांना आवश्यक त्या सूचना तात्काळ निर्गमित कराव्यात, असे शासन निर्णयात नमूद आहे.
-बाधित शेतकरी -१८४३
-बाधित क्षेत्र -१०३८.१०
-गावे- ६५
- निधी - २ कोटी ११ लाख १७ हजार