नेपाळच्या पुरात ३२० भारतीय नागरिक बेपत्ता!

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
320 Indian citizens missing in Nepal floods नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली असून, तेथील ३२० भारतीय नागरिकांशी अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही. याशिवाय, इतर देशांचे नागरिकत्व असलेल्या परंतु कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या सुमारे १०० भारतीय वंशाच्या व्यक्तींशीही संपर्क तुटलेला आहे. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे नियंत्रण कक्ष २४ तास कार्यरत आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनच्या सीमेवरील तिबेट प्रदेशात अडकलेले ४०० भारतीय नागरिक पूर्णपणे सुरक्षित असून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि बीजिंगमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहेत. चीनमधील स्थानिक प्रशासनाच्या मदतीने या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
 
 
 
320 Indian citizens missing in Nepal floods
 
पूरग्रस्त भागातून दिलासादायक बातमी म्हणजे काठमांडूमध्ये पोहोचलेले तामिळनाडूतील २१ भारतीय नागरिक आज सुखरूप दिल्लीत दाखल झाले आहेत. भारतीय राजदूतांनी काठमांडू येथे त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली होती. याशिवाय, त्रिशुली वन जलविद्युत प्रकल्पात अडकलेल्या ६३ भारतीय कर्मचाऱ्यांना काल सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, तर चीनच्या बाजूला अडकलेले ९६ भारतीय नागरिक जमिनीमार्गे नेपाळमध्ये सुरक्षित पोहोचले असून त्यांच्या सुटकेचे प्रयत्न सुरू आहेत.
 
 
आपत्तीच्या पहिल्याच दिवसापासून भारताने नेपाळला मानवतावादी मदत पुरवण्यास सुरुवात केली आहे. २६ ऑगस्टच्या संध्याकाळी पाठवलेल्या पहिल्या विमानाद्वारे तात्पुरती निवारागृहे, ब्लँकेट्स, स्वच्छता किट, सौर दिवे आणि औषधांसह १० टन मदत साहित्य रवाना करण्यात आले. त्यानंतर २७ ऑगस्ट रोजी सकाळी १०:३० वाजता पाठवलेल्या दुसऱ्या विशेष विमानातून तंबू, वॉटर पंप, किचन सेट, जनरेटर आणि खाद्यपदार्थांसह ३७.५ टन अतिरिक्त साहित्य पाठवण्यात आले आहे. नेपाळ सरकारच्या विनंतीनुसार, जमिनीवरील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपकरणांची निश्चिती करण्यासाठी भारत सरकार एक बोगदा बचाव पथक आणि वैद्यकीय पथक पाठवत आहे. तसेच, बाधित भागांमधील वाहतूक व दळणवळण लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी बेली ब्रिज आणि तांत्रिक पथके पाठवण्याचा प्रस्तावही भारताने दिला आहे.