वेध
प्रफुल्ल व्यास
rakshabandhan आज राखी पाैर्णिमा... बहिणीला सुरक्षेची हमी हा रेशमी धागा देताे. परंपरागत चालत आलेल्या या सणाला ‘गॅम्लर’ मिळाले आहे. रक्षाबंधनाला ‘भावने’पेक्षा आता ‘दिखाव्या’ला महत्त्व आले आहे. रक्षाबंधनालाही ‘इव्हेंट’ची लागण झाली आहे. राखी बांधतानाचा फाेटाे लगेच व्हाॅट्सॲप स्टेटस, इन्स्टा व फेसबुकवर ‘अपलाेड’ हाेतील. यात एक प्रश्न मात्र मागे पडताे. आपण राखीच्या पवित्र धाग्याला ‘जगताे’ आहाेत का की फक्त ‘बांधताे’? राखीचा उत्सव हा बहिणीने भावाच्या मनगटावर धागा बांधण्यापुरता मर्यादित नाही. ताे धागा संरक्षणाचा, विश्वासाचा आणि जबाबदारीचा आहे. बहीण भावाच्या हक्काच्या या सणाला बहिणीच्या सुरक्षेची हमी देण्याचा हा सण! हजाराे वर्षांपासून हा सण सुरू आहे. प्रत्येक सणाला आध्यात्मिक अनुष्ठान असते आणि अध्यात्म नैतिकता शिकवते. निसर्गानं स्त्री-पुरुष हे नातं तयार केले आहे.
या नात्याविषयी पुरुष नेहमीच सजग असताे. प्रत्येक पुरुष आपल्या आई, बहीण आणि पत्नीचा सन्मान करताे. बहिणीच्या सुरक्षिततेची जबाबदारी फक्त भावाची का? ती जेव्हा एखाद्या नराधमाच्या वासनेची बळी ठरते तेव्हा तीही काेण्या भावाची बहीण आहे, हे साेयीस्कररीत्या का विसरले जाते. समाजातल्या प्रत्येक स्त्रीकडे सुरक्षिततेच्या नजरेने पाहण्याची जबाबदारी काेणाची? आपल्या आई, बहीण आणि पत्नीकडे काेणी वाकड्या नजरेने बघितले तर आपण पेटून उठताे. मग, दुसऱ्याच्या बहिणींचे काय? तिच्या सुरक्षेची जबाबदारी काेणाची? एखाद्या बहिणीला घरातून बाहेर पडताना भीती वाटत असेल तर... म्हणूनच प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाचा, कुटुंबाच्या संस्कारांचा आणि समाजाच्या मानसिकतेचा प्रश्न झाला आहे. आधुनिक जीवनशैलीत माणूस एकमेकांच्या जवळ असूनही मनाने दूर जात आहे. सण एकत्र येण्याची संधी देतात. पण, ती संधी आता फाेटाेसेशनपर्यंतच मर्यादित झाली आहे. ती हाेऊ नये, एवढीच अपेक्षा. कुटुंब व्यवस्थेला तडे देण्याची याेजना आखणाऱ्याला हे भावते आहे हेही तेवढेच सत्य! राखीचा आणखी एक धागा आपल्या ग्रामीण जीवनाशी जाेडलेला आहे. ताे म्हणजे शेती. राखीच्या सणामागेही ग्रामीण संस्कृतीची पृष्ठभूमी आहे. आज राखी बांधणाऱ्या बहिणीच्या हातात शहरातील महागडी राखी आहे आणि त्या राखीचा धागा तयार करणाऱ्या (शेतकरी) कुटुंबाच्या घरात चिंता आहे. सणाच्या बाजारात लाखाे रुपयांची उलाढाल हाेते. पण, शेतकरी अजूनही आपल्या उत्पादनाला याेग्य भाव मिळण्याची वाट पाहताे. म्हणून राखीच्या दिवशी आपण शेतकऱ्याच्या मनगटाकडेही पाहिले पाहिजे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्याला संरक्षण आणि सुरक्षेचा धागा काेण बांधणार? राजकारणातही राख्या बांधल्या जातात. निवडणुकीपूर्वी जनतेशी नात्याचा धागा बांधला जाताे. आश्वासनांची राखी बांधली जाते. विकासाच्या गाठी बांधल्या जातात. पण, निवडणूक संपली की त्या गाठी सैल हाेतात. राजकारणात मतांचा जाेगवा कायम राहावा यासाठी रक्षाबंधनाचा सामूहिक कार्यक्रम करून अर्ध्या हातापर्यंत राख्या बांधतानाच तिच्या सुरक्षेची, तिला दिलेल्या आश्वासनांची आठवणही राजकारणी भावांनी ठेवली पाहिजे. राखीच्या धाग्यातील सर्वात माेठा अर्थ म्हणजे जबाबदारी. आज आपण मुलांना राखी बांधायला शिकवताे. पण, त्यांना स्त्रीचा सन्मान करायला किती शिकवताे? बहिणीला संरक्षण देणारा भाऊ चांगला. पण, प्रत्येक मुलीला सुरक्षित वाटेल असा समाज निर्माण करणारा भाऊ त्याहून माेठा. राखी आपल्याला संयुक्त कुटुंबाची आठवण करून देते. राखी फक्त माझ्या बहिणीची नाही तर समाजातील प्रत्येक स्त्रीच्या सन्मानाची असावी. राखीच्या धाग्याची खरी परीक्षा मनगटावर नाही तर वर्तनात हाेते. या राखीला एक संकल्प करू या बहिणीच्या हातातील राखीचा धागा फक्त भावाच्या मनगटाला बांधू नका ताे विचारांना बांधा. आई-वडिलांना वृद्धाश्रमात ढकलण्याआधी स्वतःच्या जबाबदारीचा विचार करू असा सक्षम धागा बांधा. सध्या विचार धाब्यावर बसवत प्रत्येक ठिकाणी व्यवहार, स्वार्थ चंचुप्रवेश करताे आहे.rakshabandhan वेड्या बहिणीची वेडी माया असते. त्या वेड्या बहिणीनेही स्वत:च्या आई-वडिलांचा विचार करताना नवऱ्याच्या आई-वडिलांचाही विचार केला पाहिजे. स्वत:च्या आई-वडिलांकडे लक्ष देण्याची जबाबदारी आपल्या भावजईला देताना नवऱ्याच्या आई-वडिलांना सांभाळण्याची जबाबदारी स्वत:कडे ठेवणे हेही रक्षाबंधनाचे कर्तव्यच म्हणावे. राखी सुरक्षेची हमी देते. ती सुरक्षा राष्ट्र, संस्कार आणि संस्कृतीपर्यंत पाेहाेचविण्याची जबाबदारीही समाजाची आहे. राखी बांधा विचारांची, राखी बांधा आचरणाची... नैतिकतेची... माणुसकीची! राखीचा खरा धागा मनगटाला नाही तर मानसिकतेला बांधला गेला पाहिजे.
९८८१९०३७६५