अनिल कांबळे
नागपूर
lovers-murder-case विवाहित असलेल्या युवकाचे गावातील एका महिलेशी असलेल्या अनैतिक संबंधामुळे बदनामी होत असल्यामुळे अन्य भावंडांनी प्रेमी युगुलांचे अपहरण केले. दोघांचाही खून करुन वेणा नदीच्या पात्रात फेकले. या हत्याकांडातील पाचही आरोपी ठोस पुराव्याअभावी निर्दोष सुटले. सत्र न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी हा निर्णय दिला. राहुल सुरेश बोडके, खुशाल सुरेश बोडके, आकाश अशोक राऊत, महेश राजेंद्र भुयार आणि प्रज्वल दिलीप घागरे (सर्व रा. बिहाडी,ता. कारंजा. जि. वर्धा) अशी मुक्तता झालेल्या आरोपींची नावे आहेत.

ही घटना ७ जुलै २०२२ रोजी घडली होती. बुटीबोरी येथील वेणा नदीच्या पात्रात युवक आणि युवतीचे मृतदेह तरंगताना आढळून आले. उत्तम सुरेश बोडके आणि सविता गोवर्धन परमार अशी ओळख पटली. याप्रकरणी बुटीबोरी पोलिस ठाण्यात खुनाचा व पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात उत्तम हा विवाहित असूनही सवितासोबत त्याचे संबंध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यामुळे त्याचे भाऊ राहुल व खुशाल नाराज होते. त्यांनी अन्य तिघांच्या मदतीने महेशच्या तवेरा वाहनातून दोघांचा पाठलाग करून कारंजा मार्गावरून अपहरण केले. त्यानंतर दोघांच्या डोक्यावर वाहनातील शॉकअप रॉडने वार करून तसेच नायलॉनच्या दोराने गळा आवळून दोघांची हत्या करण्यात आली आणि मृतदेह वेणा नदीत फेकण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींना अटक करून त्यांच्या कथित कबुलीजबाबावरून शॉकअप रॉड, मृतकाचे पाकीट आणि तवेरा वाहन जप्त केले होते. वाहनात रक्ताचे डाग व महिलेचे केस आढळल्याचा वैज्ञानिक अहवालही सादर करण्यात आला. मात्र, न्यायालयात २५ साक्षीदारांची साक्ष तपासल्यानंतरही सरकार पक्षाला पुराव्यांची साखळी अखंडपणे सिद्ध करता आली नाही.
संशयावरुन आरोपींना अटक
बचाव पक्षाचे वकील अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी आरोपींना केवळ संशयावरून अटक करण्यात आल्याचा युक्तिवाद केला. वाहनाची जप्ती तत्काळ न करता ते पोलिस ठाण्यातच उभे ठेवण्यात आले होते. त्यामुळे वाहनात रक्ताचे डाग व केस नंतर टाकण्यात आले असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाहन सील न करणे, महत्त्वाच्या साक्षीदारांच्या जबाबांमध्ये त्रुटी आणि सीसीटीव्ही तपासातील उणिवांकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. सरकार पक्ष गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याने न्यायालयाने पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकार पक्षातर्फे एपीपी कल्पना पांडे, तर बचाव पक्षातर्फे अॅड. चंद्रशेखर जलतारे व अॅड. चेतन ठाकूर यांनी काम पाहिले.