मुंबई,
disha salian case दिवंगत सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाली असून न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. दिशा सालियन यांचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत त्यांच्या मुलीवर बलात्कार करून हत्या झाल्याचा गुन्हा दाखल करून पुढील तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.गुरुवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच आवश्यक वाटल्यास एफआयआर दाखल करून पुढील तपास करता येऊ शकतो, असे निरीक्षणही न्यायालयाने नोंदवले होते. या प्रकरणाकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दृष्टिकोनातून नव्हे, तर एका वडिलांनी आपली मुलगी गमावली आहे, या संवेदनशील भूमिकेतून पाहत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.

आजच्या सुनावणीत सरकारी वकील शिशिर हिरे आणि आदित्य ठाकरे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सुदीप पासबोला यांनी आपापली बाजू मांडली. यावेळी पासबोला यांच्या युक्तिवादात राणे कुटुंबीयांच्या नावाचा उल्लेख झाला. त्यांच्या म्हणण्यानुसार, राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून ही याचिका दाखल करण्यामागे भूमिका असल्याचा दावा करण्यात आला. या संदर्भात राणे, त्यांची मुले आणि राष्ट्रीय माध्यमातील एका व्यक्तीचा, अर्णब गोस्वामी यांचा उल्लेख करण्यात आला.आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी याचिकेतील मागण्या कायदेशीरदृष्ट्या टिकण्यायोग्य नसल्याचा युक्तिवाद केला. दिशा सालियन यांच्या वडिलांबद्दल पूर्ण सहानुभूती असल्याचे सांगतानाच, त्यांच्या मुलीच्या मृत्यूवरून सुरू असलेले राजकारण थांबायला हवे, अशी भूमिका त्यांनी न्यायालयात मांडली. तसेच राजकीय वैरातून तथ्यांवर आधारित नसलेले आरोप केले जात असल्याचा दावाही करण्यात आला.
दुसरीकडे, सरकारी वकिलांनी ही याचिका फेटाळण्याची मागणी केली. दिशाच्या मृत्यूमध्ये कोणताही गुन्हा घडल्याचे वैद्यकीय तपासणीतून समोर आले नसल्याचे त्यांनी सांगितले. मेडिकल रिपोर्टमध्ये लैंगिक अत्याचार झाल्याचे आढळले नसून डॉक्टरांच्या तपासणीतही त्यासंदर्भात कोणतेही पुरावे मिळाले नाहीत, असा युक्तिवाद करण्यात आला. मोठ्या प्रमाणावर आरोप-प्रत्यारोप होत असल्यामुळे तपास बराच काळ सुरू ठेवण्यात आला, असेही सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले.सरकारी वकिलांनी दिशासोबत राहत असलेल्या रोहित रॉयच्या जबाबाचाही उल्लेख केला. दिशाच्या मानसिक स्थितीबाबत त्याने जबाब दिला असून, ती नैराश्यात होती आणि त्यातून तिने आत्महत्या केल्याचे त्याने सांगितल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच पोलिसांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देऊन कोणाकडे काही तक्रार किंवा माहिती असल्यास पुढे येण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यानंतरही कोणी समोर आले नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.
दरम्यान, दिशाच्या मृत्यूशी संबंधित दुखापतींबाबतही सुनावणीदरम्यान चर्चा झाली. ती तोंडावर पडली असल्याचे सांगितले जात असताना शरीरातील महत्त्वाची हाडे फ्रॅक्चर कशी झाली नाहीत, अशी विचारणा न्यायालयाने सरकारी वकिलांना केली. त्यावर दात फ्रॅक्चर झाल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. प्रत्येक व्यक्ती उंचीवरून पडल्यानंतर होणाऱ्या दुखापती वेगवेगळ्या असू शकतात, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.यावेळी १५ जानेवारी २०२४ रोजी सतीश सालियन यांनी दिलेला जबाबही न्यायालयासमोर वाचण्यात आला. दिशाची एक डील रद्द झाल्याने आर्थिक नुकसान झाले होते आणि त्यातून तिने आत्महत्या केली असावी, असे त्या जबाबात सतीश सालियन यांनी म्हटल्याचे सरकारी वकिलांनी सांगितले. आतापर्यंत त्यांचा पाच वेळा जबाब नोंदवण्यात आला असून, यापेक्षा अधिक काही सांगायचे नसल्याचे त्यांनी म्हटल्याचा दावा सरकारी पक्षाने केला. तसेच अन्य एका गुन्ह्यात सतीश सालियन यांचा सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत जबाब नोंदवण्यात आला होता आणि त्यातही त्यांनी कोणताही संशय व्यक्त केला नव्हता, अशी माहिती सरकारी वकिलांनी न्यायालयात दिली. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणातील याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आहे. त्यामुळे आता न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.