राहुल गांधींच्या मनुस्मृतीवरील वक्तव्यावर शंकराचार्य संतप्त!

काँग्रेसवर बहिष्काराची हाक

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
नवी दिल्ली,
call for boycott of congress मनुस्मृतीवरील वक्तव्यामुळे काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ज्योतीर्मठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राहुल गांधींवर सनातन धर्मग्रंथांचा वारंवार अपमान केल्याचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. धार्मिक ग्रंथांबाबत राजकीय फायदा-तोट्याच्या दृष्टिकोनातून भाष्य न करता आधी धार्मिक नेत्यांशी चर्चा करून त्यांचा अर्थ समजून घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. राहुल गांधींनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही, तर हिंदूंनी काँग्रेसवर बहिष्कार टाकावा आणि पक्षाला मतदान करू नये, यासाठी मोहीम सुरू करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
 
call for boycott of congress
 
राहुल गांधी यांनी अलीकडेच पुण्यातील ‘छत्रौं की गुंज’ कार्यक्रमात मनुस्मृतीवर टीका केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी काँग्रेस, किंवा कोणत्याही पक्षाला धार्मिक ग्रंथांचा अपमान करण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. मनुस्मृतीतील स्त्रियांच्या संरक्षणासंदर्भातील विचारांचा संदर्भ देत त्यांनी आपली भूमिका मांडली. त्यांच्या मते, नवजात मुलगी असो, पत्नी असो किंवा वृद्ध आई असो, कुटुंबातील सदस्यांच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे चुकीचे नाही. मुलाने आपल्या आईची काळजी घेणे हे त्याचे कर्तव्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
 
दरम्यान, राहुल गांधींनी मनुस्मृतीवरील केलेल्या टीकेवरून राजकीय आणि धार्मिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी राहुल गांधींनी धार्मिक ग्रंथांविषयी बोलताना त्यांचा मूळ अर्थ समजून घेण्याची गरज असल्याचे सांगितले. तसेच, त्यांनी माफी न मागितल्यास काँग्रेसविरोधात बहिष्काराची मोहीम उभारण्याचा इशारा दिल्याने या वादाला आणखी तीव्र राजकीय वळण मिळण्याची शक्यता आहे.