नागपूर,
rameshwari shatabdi chowk रामेश्वरी ते शताब्दी चौक मार्गावरील मार्ग क्रमांक ३ चा दिशादर्शक फलक सध्या धोकादायक अवस्थेत आहे. हा फलक चक्क विद्युत खांब आणि डीपीवर पडलेल्या स्थितीत दिसून येत असून, नागरिकांना मार्गदर्शन करण्यासाठी लावण्यात आलेला फलकच सध्या उपयोगहीन ठरला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
दिशादर्शक फलक लटकलेल्या तसेच पडलेल्या अवस्थेत असल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मार्ग शोधताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिवाय फलक विद्युत खांब आणि डीपीजवळ पडल्याने सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या समस्येबाबत नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे. संबंधित विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून धोकादायक अवस्थेतील फलक हटवावा किंवा तो योग्य ठिकाणी बसवावा, तसेच परिसरातील संभाव्य धोका दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सौजन्य: अशोक माटे, संपर्क मित्र