तंटामुक्त समितीच ठरतेय् तंट्याचे कारण

अध्यक्षपदासाठी गावागावांत राजकीय गटबाजी, पोलिसांना करावा लागतोय् हस्तक्षेप

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |

 

नागपूर
dispute-free-committee गावातील वाद गावातच मिटविण्यासाठी शासनाने सुरू केलेली तंटामुक्त गाव योजनाच नागपूर जिल्ह्यात वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. शांतता आणि सलोखा राखण्यासाठी स्थापन झालेल्या तंटामुक्त समित्यांच्या अध्यक्षपदावरून आता जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तंटे सुरू झाले आहेत.
 
samiti
 
नेमका प्रकार काय?

तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांची निवड ही ग्रामसभेतून केली जाते. पण अध्यक्ष होण्यासाठी आता इच्छुकांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. आपल्या समर्थकाला अध्यक्ष करण्यासाठी गटबाजी केली जात आहे. काही ठिकाणी तर ग्रामसभेतच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून, पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागत आहे. त्यामुळे तंटे मिटवणारी समितीच आता राजकारणाचा केंद्रबिंदू ठरली आहे. शासनाच्या नियमानुसार या समितीत गुंड प्रवृत्तीच्या, अवैध धंदे करणाऱ्या किंवा असामाजिक तत्त्वांच्या व्यक्तींना स्थान नसते. सदस्य हा उत्तम चारित्र्याचा असावा असा दंडक आहे.

 
समित्यांना पुनरुज्जीवित करण्याची गरज

तंटामुक्त समित्या हा ग्रामीण सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. या समित्या टिकल्या तरच गावात सामाजिक सलोखा टिकेल. या समित्यांनी प्रामाणिकपणे उपक्रम राबवले तर जनजागृती होऊन गावांचे संघटन होऊ शकते. त्यामुळे अध्यक्षपदाची निवड ही राजकीय वर्चस्वाचा विषय न बनवता, गावाच्या हिताचा विचार करून करावी आणि या समित्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन त्यांना पुनरुज्जीवित करावे, अशी मागणी होत आहे.

 

नागपूर ग्रामीणमध्ये स्थिती काय?

जिल्ह्यातील काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड तालुक्यांतील अनेक ग्रामपंचायतींमध्ये अध्यक्ष निवडीवरून राजकीय वर्चस्वाची लढाई सुरू आहे. नियमानुसार तंटामुक्त अध्यक्षाची निवड ग्रामसभेतून व्हायला हवी. पण प्रत्यक्षात गावातील दोन-तीन राजकीय गट आपापल्या समर्थकाला अध्यक्ष करण्यासाठी लॉबिंग करीत आहेत. काही ठिकाणी ग्रामसभेतच शिवीगाळ आणि आरोप-प्रत्यारोप झाल्याने नागपूर ग्रामीण पोलिसांना मध्यस्थी करावी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.