बीजिंग,
Earthquake in Sichuan China नैऋत्य चीनमधील सिचुआन प्रांताला शुक्रवारी भूकंपाचा जोरदार धक्का बसला. चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरच्या माहितीनुसार, लोंगचांग शहरात ५.० तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला. अचानक जाणवलेल्या या धक्क्यांमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. भूकंप जाणवताच अनेक नागरिकांनी खबरदारी म्हणून घराबाहेर धाव घेतली.चीनची अधिकृत भूकंप निरीक्षण संस्था असलेल्या चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरने या भूकंपाची पुष्टी केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू सिचुआन प्रांतातील लोंगचांग शहर असल्याचे सांगण्यात आले आहे. धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली, मात्र परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवण्यात येत आहे.
सिचुआन हा चीनमधील भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील प्रांत मानला जातो. या भागात यापूर्वीही अनेकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे स्थानिक नागरिक भूकंपाच्या घटनांबाबत सतर्क असतात. ५.० तीव्रतेचा भूकंप मध्यम स्वरूपाचा मानला जात असून, त्याच्या परिणामामुळे इमारतींना किरकोळ तडे जाण्याची शक्यता असते. दरम्यान, या भूकंपामुळे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणावर मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही. प्रशासन आणि संबंधित यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी घाबरून न जाता आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.