‘वर्षभर कारवाई नाही’

ऑटो-टॅक्सी चालकांसाठी फडणवीसांचा मोठा निर्णय

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
मुंबई,
Fadnavis's decision for auto-taxi drivers महाराष्ट्रातील ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कामकाजासाठी आवश्यक असलेली बोलचालीची मराठी शिकण्यासाठी चालकांना आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत मराठी बोलता आली नाही म्हणून संबंधित चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. चालक संघटनांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ देण्याची मागणी केली होती. सरकारने ही मागणी मान्य करत एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
 
Fadnavis
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यापूर्वीही या मुद्द्यावर सरकारची भूमिका स्पष्ट केली होती. ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत पारंगत होणे आवश्यक नसून, प्रवाशांशी आणि कामाच्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आवश्यक तेवढी मूलभूत मराठी येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईतील चालकांनीही कामासाठी लागणारी मराठी शिकण्याची तयारी दर्शवली असून, या उपक्रमाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. मात्र, या व्यवसायात विविध वयोगटातील चालक असून अनेकांनी शिक्षण खूप पूर्वीच सोडलेले आहे. त्यामुळे कमी कालावधीत भाषा शिकणे काही चालकांसाठी अडचणीचे ठरू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.
चालकांना आवश्यक ती मराठी शिकवण्यासाठी राज्य सरकारकडून व्यापक योजना तयार केली जाणार आहे. यासाठी विविध वर्ग तसेच मराठी शिकण्यासाठी आवश्यक साहित्य विकसित करून चालकांना मदत केली जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी चालकांना एक वर्षाचा अतिरिक्त कालावधी मिळणार असून, या मुदतीत मराठी बोलता न आल्याने त्यांच्यावर कारवाई केली जाणार नाही. त्यामुळे मराठी भाषेच्या अनिवार्यतेवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑटो-रिक्षा आणि टॅक्सी चालकांना सरकारच्या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.