गोंदिया
attempts-suicide उपोषण मागे घेतल्यानंतर पुन्हा कामावर रुजू होण्यासाठी गेलेल्या शहरातील शासकीय बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील १४ अटेंडंटना कामावर घेण्यास नकार देण्यात आल्याने निर्माण झालेल्या तणावातून एका महिला अटेंडंटने मुदतबाह्य कफ सिरप प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.
रजनी संदीप कुंभरे (४१) रा. छोटा गोंदिया) असे संबंधित महिलेचे नाव आहे. दरम्यान, कामावरून काढण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुणवंता भिमराव साखरे (४२) रा. कुडवा वॉर्ड क्र. ३, गोंदिया यांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी जमादार धीरज आनंद महावत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयात पुणे येथील स्मार्ट स्व्हिहसेस कंपनीच्या माध्यमातून सुमारे ८० महिला अटेंडंट म्हणून विविध कामे करतात.
दरम्यान, आपल्या विविध मागण्यांसाठी या अटेंडंटनी ११ ऑगस्टपासून साखळी उपोषण सुरू केले होते. प्रशासनाकडून मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर मंगळवारी २५ ऑगस्ट रोजी उपोषण मागे घेण्यात आले. उपोषण मागे घेतल्यानंतर बुधवारपासून प्रत्येक अटेंडंटने पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. विनायक रुखमोडे यांनी सांगितले होते. त्यानुसार अटेंडंट सकाळी कामावर दाखल झाले. मात्र, गंगाबाई स्त्री रुग्णालयात कार्यरत असलेल्या १४ अटेंडंटना कामावर रुजू करून घेण्यात आले नाही. त्यामुळे कामावरून आपल्याला काढल्याने आता पुढे काय या विवंचणेतून रजनीने मुद्दतबाह्य कफसिरपचे प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रविण बोरकुटे यांच्याशी विचारणा केली असता त्यांनी तपास सुरु असल्याचे सांगितले.