वर्धा,
nepal flood नेपाळमधील रासुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या महापुरात १६० व्यक्तींचा मृत्यू झाला तर ७५० हून अधिक नागरिक बेपत्ता आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळवर मोठे संकट ओढावले असून तेथे वर्धा जिल्ह्यातील चार व्यक्ती अडकलेले आहे. सध्या ते सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. या चार व्यक्तींपैकी एक सेलू तर उर्वरित तीन व्यक्ती हिंगणघाट तालुक्यातील रहिवासी आहे. ते पर्यटनासाठी नेपाळ येथे गेल्याचे सांगण्यात येत आहे. दीपक पांडे, रा. वाघ सावली ता. हिंगणघाट तर इंदिरा चौधरी, वर्षा उपाध्याय व सुलोचना थापरे तिन्ही रा. चारमंडळ ता. सेलू अशी पर्यटकांची नावे आहेत.

नेपाळ येथे महापुरात पर्यटक अडकल्याची माहिती समोर आली. या पृष्ठभूमीवर जिल्ह्यातील अडकलेल्या नागरिक व पर्यटकांची माहिती प्रशासनाला देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. जिल्ह्यातील कोणताही नागरिक अथवा पर्यटक नेपाळमध्ये अडकला असल्यास संबंधिताने किंवा नातेवाईकांनी अचूक नाव, मोबाईल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण तसेच प्रवासासंबंधी उपलब्ध माहिती प्रशासनाकडे तातडीने नोंदवावी. माहिती नोंदविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या लिंकवर माहिती भरताना संबंधित व्यक्तीचे अचूक नाव, संपर्क क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण आणि प्रवासाची माहिती नमूद करावी.nepal flood नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित यंत्रणांशी आवश्यक समन्वय साधण्यात येत असून, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधता येणार आहे. नेपाळमध्ये जिल्ह्यातील चार पर्यटक अडकले असून ते २९ ऑगस्टला रेल्वेचा प्रवास करीत नागपूर येथे पोहोचणार असल्याचेही जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
नागपूरच्या समुहासोबत गेले होते नेपाळला
नागपूर जिल्ह्यातील श्री स्वामी महाराज यांच्या समूहासोबत सुमारे ११० नागरिक २२ ऑगस्ट रोजी नेपाळ येथील काठमांडू येथे पर्यटन व धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी गेले आहेत. यात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. दरम्यान नेपाळमध्ये २६ रोजी फ्लॅश फ्लडची घटना घडली असली तरी सदर घटनेचा या समूहातील पर्यटकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झालेला नाही. हे सर्व ११० नागरिक सुरक्षित आहेत. जिल्हा नियंत्रण कक्ष त्यांच्या सतत संपर्कात असून त्यांच्या सद्यस्थितीबाबत नियमितपणे माहिती घेतली जात आहे.