गडचिरोली
badshahs-song gadchirolis-suraj गडचिरोली जिल्ह्यातील युवा नृत्यकलाकार सुरज सुनील वैरागडे याने आपल्या 15 वर्षांच्या अथक संघर्षाला मोठ्या यशाची किनार दिली आहे. मुंबईत गेल्या 15 वर्षांपासून नृत्य क्षेत्रात आपले स्थान निर्माण करण्यासाठी संघर्ष करणार्या सूरजने आता प्रसिद्ध गायक बादशाह यांच्या ‘चिम्ना’ या गाण्याच्या शूटमध्ये ‘ब्ल्यु फॉक्स कॅरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळवली आहे. या गाण्याचे शूट कोल्हापूर येथे पार पडले.
गडचिरोली जिल्ह्यातून नृत्य क्षेत्रात येऊन मुंबईसारख्या मायानगरीत तब्बल 15 वर्षे संघर्ष करणे आणि त्यानंतर मोठ्या सेलिब्रिटीसोबत काम करण्याची संधी मिळवणे, ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
सुरजने ‘चिम्ना’ गाण्याच्या शूटमध्ये ‘ब्ल्यु फॉक्स कॅरेक्टरची मुख्य भूमिका साकारली आहे. या प्रोजेक्टमध्ये प्रसिद्ध गायक बादशाह यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाल्याने त्याच्या नृत्यप्रवासाला एक नवी उंची मिळाली आहे. 15 वर्षांच्या प्रवासात सूरजने मुंबईमध्ये अनेक ऑडिशन्स, सराव आणि संघर्षाचा सामना केला. यश मिळण्यासाठी सातत्याने मेहनत घेत त्याने नृत्य क्षेत्रातील आपले स्वप्न जिवंत ठेवले. अखेर त्याच्या मेहनतीला मोठ्या प्रोजेक्टच्या माध्यमातून यश मिळाले.
गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातून सुरू झालेला सुरजचा प्रवास मुंबईतील 15 वर्षांच्या संघर्षानंतर आता मोठ्या मनोरंजनविश्वापर्यंत पोहोचला आहे. त्याच्या या यशामुळे गडचिरोलीतील तसेच महाराष्ट्रातील युवा नृत्यकलाकारांना प्रेरणा मिळणार आहे. संघर्ष कितीही मोठा असला तरी स्वप्नावर विश्वास आणि मेहनत कायम ठेवली, तर यश नक्की मिळते, हे सुरज वैरागडे यांच्या 15 वर्षांच्या प्रवासातून अधोरेखित झाले आहे.
माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण
गडचिरोलीतून मुंबईत येऊन 15 वर्षे डान्स क्षेत्रात संघर्ष केला. अनेक अडचणी आल्या, पण माझे स्वप्न कधीच सोडले नाही. आज बादशाह यांच्यासोबत ‘चिम्ना’ गाण्यात ‘ब्ल्यु फॉक्स कॅरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. कोल्हापूरमध्ये झालेल्या या शूटचा अनुभव माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव आहे, असे सूरज सुनील वैरागडे यांनी सांगितले.