जयपूर,
girls die before Raksha Bandhan रक्षाबंधनाच्या सणाच्या काही तास आधी जयपूरमध्ये घडलेल्या हृदयद्रावक दुर्घटनेने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयसिंगपुरा खोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सदवा मोडजवळील दरियावली गल्लीत बांधकाम सुरू असलेल्या घराच्या पायासाठी खोदलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दोन भावंडांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत ८ वर्षीय आलिया आणि तिचा ५ वर्षीय भाऊ मोहम्मद अयान यांचा जीव गेला.मिळालेल्या माहितीनुसार, आलिया आणि मोहम्मद अयान हे बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ खेळत होते. खेळताना दोघेही अचानक पायासाठी खोदलेल्या खोल खड्ड्यात पडले. खड्ड्यात पाणी साचले असल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही आणि दोघेही बुडाले. ही घटना लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोन्ही मुलांना पाण्यातून बाहेर काढले.

स्थानिक नागरिकांनी मुलांना वाचवण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू केले. त्यांना सीपीआर देण्यात आला आणि उपचारासाठी एसएमएस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपुरा खोर पोलिसांचे पथकही घटनास्थळी पोहोचले आणि परिसराची पाहणी केली. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.मृत मुलांचे वडील लियाकत हे मूळचे उत्तर प्रदेशातील असून जयपूरमध्ये मजुरीचे काम करतात. दोन लहान मुलांचा एकाच दुर्घटनेत मृत्यू झाल्याने कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव साजरा होण्याऐवजी या कुटुंबाला आपल्या दोन्ही चिमुकल्यांचा कायमचा विरह सहन करावा लागत आहे.
दरम्यान, लियाकत यांनी बांधकामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, घराच्या पायासाठी खोदलेला खड्डा यापूर्वीही वारंवार पाण्याने भरत होता. मात्र, त्यातील पाणी काढण्याची किंवा खड्डा सुरक्षित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्यात आली नाही. त्यामुळे हा खड्डा उघडा आणि पाण्याने भरलेला का ठेवण्यात आला होता, तसेच या दुर्घटनेला जबाबदार कोण, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. रक्षाबंधनाच्या काही तास आधी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.