पुराच्या पाण्यातही माणुसकी हरवली! मृतदेहाचे केस ओढत काढले सोन्याचे कानातले! video

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
काठमांडू,
gold earrings from the dead body नेपाळ आणि तिबेटच्या सीमावर्ती भागात महापुरामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली असताना माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नारायणी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या एका महिलेच्या मृतदेहावरील सोन्याचे कानातले दोघांनी काढून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या घटनेचा ४१ सेकंदांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर नेपाळ पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले आहे.व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दोन पुरुष पाण्यातून महिलेचा मृतदेह बाहेर काढताना दिसत आहेत. यासाठी त्यांनी लाकडाचा आधार घेतला तसेच मृतदेहाचे केस पकडून त्याला पाण्याबाहेर ओढले. त्यानंतर मृतदेहाच्या दोन्ही कानांतील सोन्याचे कानातले काढून घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या प्रकाराने संतापाची लाट पसरली. विशेष म्हणजे, घटनास्थळी उपस्थित असलेले काही लोक हा प्रकार पाहत होते, तर काही जण मोबाईलमध्ये त्याचे चित्रीकरण करत होते.
 
 
 
gold earrings from the dead body
 
व्हिडीओची गंभीर दखल घेत चितवन पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी मदन गुरुंग, वय २५, आणि उमेश चौधरी, वय ३८, यांची ओळख पटवली. त्यानंतर गुरुवारी भरतपूर महानगरपालिका-१ मधील पोखरा बस पार्कजवळून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे. आपत्तीच्या काळात मृत आणि पीडित व्यक्तींच्या वस्तू लुटणे किंवा कोणत्याही प्रकारचे अमानुष कृत्य सहन केले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.दरम्यान, नेपाळ आणि तिबेटमधील अनेक भाग सध्या दशकातील भीषण पुराच्या संकटाला सामोरे जात आहेत. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत ३९२ जणांचा मृत्यू झाला असून १,४०० हून अधिक नागरिक बेपत्ता असल्याची माहिती आहे. पुरामुळे अनेक भारतीय नागरिकही अडकले असून भारत सरकार सुमारे २९० बेपत्ता भारतीय नागरिकांचा शोध घेत आहे. पुराच्या तडाख्यात अनेक रस्ते आणि पूल वाहून गेले आहेत. काही भागांत १.५ मीटरपेक्षा अधिक चिखल साचल्याने बचाव पथकांना प्रभावित परिसरात पोहोचण्यात अडथळे येत आहेत. अशा भीषण परिस्थितीत नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी यंत्रणा झटत असताना मृतदेहावरील सोन्याची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्याने या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.