तुरुंगात इम्रान खान यांच्या हत्येचा कट!

सुलेमान आणि कासिम यांचामोठा दावा

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
इस्लामाबाद,
Imran Khan's assassination plot in prison कारागृहात असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रकृतीवरून मोठा गदारोळ सुरू असतानाच त्यांच्या दोन्ही मुलांनी पाकिस्तानी सरकारवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. इम्रान खान यांचे पुत्र सुलेमान आणि कासिम यांनी एका मुलाखतीदरम्यान दावा केला आहे की, पाकिस्तानी सरकारला त्यांच्या वडिलांना मारायचे असून पाकिस्तानमध्ये त्यांना संपवण्याचा उघड प्रयत्न केला जात आहे. प्रसारित झालेल्या आणि इंग्लंडचे माजी कर्णधार माईक अ‍ॅथर्टन यांनी घेतलेल्या एका मुलाखतीत हे आरोप करण्यात आले.
 
Imran Khan
 
यापूर्वी माईक अ‍ॅथर्टन यांच्यासह २१ दिग्गज क्रिकेटपटूंनी पाकिस्तानी सरकारला पत्र लिहून इम्रान खान यांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवण्याची विनंती केली होती. या मुलाखतीत बोलताना कासिम म्हणाले की, इम्रान खान यांचा आवाज दाबून टाकण्यासाठी आणि त्यांना शक्य तितका जास्त काळ तुरुंगात ठेवण्यासाठीच हे सर्व केले जात आहे. नुकतीच नातेवाईकांनी भेट घेतली असता परिस्थिती अत्यंत बिकट असल्याचे समोर आले असून, फाशी दिलेले किंवा तुरुंगात मरण पावलेले इतर राजकीय कैदी आणि इम्रान खान यांच्या परिस्थितीची तुलना केली जात आहे. सध्या इम्रान खान यांना दिवसातील २३ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच कोठडीत पूर्णपणे एकांतवासात ठेवले जात आहे. यापूर्वी इम्रान खान यांची बहीण उझमा यांनीही शहबाज शरीफ यांच्या सरकारवर असेच गंभीर आरोप केले होते.
दुसरे पुत्र सुलेमान यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, सरकार निष्पक्ष आणि तटस्थ डॉक्टरांकडून इम्रान खान यांची तपासणी का करून घेत नाही, हे विचार करायला लावणारे आहे. न्यायालयाने वैद्यकीय तपासणीचे आदेश दिल्यानंतर आशा निर्माण झाली होती, परंतु खाजगी रुग्णालयाऐवजी सरकारी रुग्णालयात नेल्याने भीती खरी ठरली. तिथून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आले, त्यावेळी दुखापतीमुळे त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधलेली होती आणि ते अत्यंत तणावात दिसत होते. नेहमी शांत आणि आत्मविश्वासपूर्ण दिसणारे इम्रान खान अशा स्थितीत पाहणे चिंताजनक आहे. दोन्ही मुलांनी २०२२ पासून वडिलांना प्रत्यक्ष पाहिलेले नाही, तर मार्च महिन्यात त्यांच्याशी शेवटचे फोनवर बोलणे झाले होते. त्यांना वडिलांना भेटायचे होते, मात्र त्यांचा व्हिसा नाकारण्यात आला. पीटीआयने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, ही मुलाखत लॉर्ड्सवर इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान प्रसारित करण्यात आली होती. यामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) हा सामना रद्द करण्याचा विचार केला होता, तसेच या मुलाखतीबाबत प्रसारकाकडे अधिकृत तक्रारही दाखल केली होती.