बाजार पुन्हा रस्त्यावर; नपंची कारवाई फक्त दिखावा?

प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

    दिनांक :28-Aug-2026
Total Views |
सेलू
nagar-panchayat-selu शहरातील आठवडी बाजार पुन्हा एकदा रहदारीच्या रस्त्यावर भरल्याने नगरपंचायत प्रशासनाच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तीन महिन्यांपूर्वी रस्त्यावर भरणार्या बाजारावर अंकुश लावत मुख्याधिकार्यांनी आठवडी बाजाराच्या दिवशी प्रत्यक्ष रस्त्यावर तळ ठोकून राहत होते. त्यामुळे बाजार नियोजित जागेत भरू लागला होता. मात्र, २५ ऑगस्ट रोजी पुन्हा मोठ्या अंतरापर्यंत रस्त्यावर दुकाने थाटण्यात आल्याने वाहतूक कोंडीसह अपघाताचा धोका निर्माण झाला होता.
 
seku bazar
 
रस्त्याच्या दुतर्फा दुकाने लागल्याने बाजारात खरेदीसाठी येणार्या नागरिकांची वाहने रस्त्याच्या कडेला उभी राहत आहेत. परिणामी, वाहतुकीचा खोळंबा होत असून पादचारी, वाहनचालक तसेच ग्राहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तीन महिन्यांपूर्वी नगरपंचायतीने केलेल्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र, आता पुन्हा बाजार रस्त्यावर आल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाची ती कारवाई केवळ काही दिवसांसाठीचे ‘सोंग’ होते का, असाही सर्वाल उपस्थित होऊ लागला आहे.
आठवडी बाजारासाठी नियोजित जागेत ओटे बांधण्यात आले असून सिमेंटचे रस्तेही तयार करण्यात आले आहेत. सुविधा उपलब्ध असतानाही नियोजित जागा रिकामी ठेवून रस्त्यावर बाजार भरविण्याचे कारण काय, हा संशोधनाचा विषय बनला आहे. बाजार रस्त्यावर भरविण्यावरील नगरपंचायतीचा प्रतिबंध नेमका का शिथिल झाला, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे. रस्त्यावर भरणारा आठवडी बाजार तातडीने बंद करून नियोजित जागेतच बाजार भरवावा; अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
दुप्पट वसुलीचा मुद्दा चर्चेत
आठवडी बाजाराचा ठेका महागात गेल्याची चर्चा असताना, ठेकेदाराच्या मर्जीप्रमाणे बाजार रस्त्यावर भरविण्यास नगरपंचायतीची मूकसंमती आहे का, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रस्त्यावर बसणार्या काही दुकानदारांच्या म्हणण्यानुसार, ‘डबल कर देतो म्हणून रस्त्यावर बसतो’; मात्र या कथित दुप्पट वसुलीच्या बदल्यात नागरिकांच्या सुरक्षिततेचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.